शुक्रवार, ११ डिसेंबर, २०१५

सागरा प्राण खरंच तळमळला



      आजकाल प्रत्येक तरुण कुठल्यातरी कारणावरून भारताला शिव्याच घालत असतात आणि त्यातले अनेक जण भारत सोडून जायची भाषा बोलत असतात. पण जेव्हा भारत खरंच अत्यंत दयनीय स्थितीत होता तेव्हा मात्र भारत सोडून जाण्यापेक्षा बाहेरून शिक्षण घेऊन भारतात येण्याची आणि भारताच्या विकासासाठी ते शिक्षण उपयोगात आणण्याची आस अनेकांना होती. त्यात माझ्या मते पाहिलं नाव जर कोणाचं असेल तर ते स्वा. विनायक दामोदर सावरकर यांचंच.आणि अशा माणसानं मातृभूमीचा विरह सहन न झाल्याने सागराशी साधलेला मुक्त संवाद म्हणजे ‘सागरा प्राण तळमळला’.यात सावरकरांच्या मनातील तळमळ, आर्तता तर अक्षरा-अक्षरात भरलेली आहेच. पण त्याबरोबरच अनेक गोष्टींचा ओलावा त्यात जाणवतो.    पहिल्याच कडव्यात ‘भूमातेच्या चरणतला तुज धुता’ असं वाचताना मला आठवतो तो भारताचा नकाशा आणि भारतमातेचे हात-पाय धुणारे सिंधुसागर आणि बंगाल उपसागर तर पाय धुणारा हिंद महासागर आणि यांतून दिसतं ते सावरकरांचं भौगोलिक ज्ञान. प्रगाढपंडित सावरकरांच्या अफाट बुद्धिमत्तेची अशी छोटी-छोटी अनेक उदाहरणं या कवितेत सापडतात.  ‘विश्वसलो या तव वचनी मी’ वाचत असताना जाणवतं कि आपण भारतीय पहिल्यापासूनच अतिसहिष्णू, उदारमतवादी. हीच आपली भूमिका आपल्याला दरवेळी नडते; पण आपण काही सुधारत नाही. अगदी आजसुद्धा हेच होताना दिसतं.  ‘येईन त्वरे कथुनी सोडतो तुजला’ म्हणत असताना मला दोघांची आठवण होते. नाईलाज म्हणून मुलांना पाळणाघरात सोडून जाणारे आजचे पालक आणि मोठी झाल्यावर शिक्षणासाठी घरदार, देश सोडून परदेशी जाणारी आजची मुलं. सावरकरसुद्धा खरं तर शिक्षणासाठीच इंग्लंडला गेले, पण हे करत असताना आपण बॅरिस्टर होऊन भारतात परतायचंच हा दृढनिश्चय होता. जर भारत महासत्ता झालेला बघायचा असेल तर आजच्या तरुणांनी आपली भूमिका सोडून सावरकरांची हि भूमिका आत्मसात करायलाच हवी.‘हि फसगत झाली तैसी’ आणि ‘दशदिशा तमोमय होती’ या दोन्ही ओळींमध्ये अश्रूच भरले असावेत असं माझं मत; पण आपली तळमळ व्यक्त करताना सुद्धा पिंजर्यात अडकलेल्या पोपटासारखी किंवा जाळ्यात अडकलेल्या हरणासारखी स्वतःची झालेली अवस्था सावरकर ज्यावेळी सांगतात, तेव्हा त्यांचे शब्द त्यांच्या प्रतिभेची साक्षच देतात.‘जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा, हा व्यर्थ भार विद्येचा’ अहो, इथे आम्हांला स्वतःसाठी व्यवस्थित शिकायला जमत नाही आणि सावरकर म्हणतात कि जर मी घेतलेलं शिक्षण भारतमातेच्या उपयोगी पडलं नाही तर ते फुकट जाईल. धन्य ती राष्ट्रभक्ती!पुढच्याहि ओळींत भरतभूमीच्या ताऱ्यावरचं प्रेम ओथंबून वाहताना जाणवतं. त्याच प्रेमाच्या भरात भारताला वत्सल आमराई, नवनव्या फुलांनी रोज फुलणाऱ्या बहरणाऱ्या सुंदर वेली आणि छोटाच पण सुवासिक असणारा गुलाब असं सगळंच असणार्या फुलबागेची उपमा दिसते आणि भारताचं शब्दशः सौंदर्य वाचून आपण भारतीय असल्याचा सार्थ अभिमान मनात आल्याशिवाय राहत नाही.मला इथे मिळणाऱ्या राजवाड्यापेक्षा तिथे छोटीशी झोपडी जरी मिळाली तरी मी तिथे सुखात असेन आणि एखाद्या इतर राज्याचा राजा होण्यापेक्षा मी तिच्या जंगलात वनवास पत्करेन असं म्हणताना ‘...जन्मभुमीश्च स्वर्गादपि गरीयसी’ म्हणजे काय हे नव्याने सांगावं लागत नाही.‘तुज सरित्पते जी सरिता रे’ ही तर अफलातून काव्यात्मक कल्पना, सावरकरांच्या प्रतिभेची दुसरी साक्षीदार. नद्या या पर्वतातून सागराकडे धावत जातात आणि तिथेच राहतात म्हणून नदी हि वधू, पर्वत हा वधूपिता आणि सागर हा नवरदेव, नदीचा प्रियकर.आता मला तू भूलवू शकत नाहीस, मला तुझा डाव कळलाय आणि मला आई आठवतेय. अशावेळी जर मला माझ्या आईचा विरह सहन करायला लावशील तर तुला तुझ्या प्रेयसीची, तुझ्या पत्नीची शपथ. हि खरं तर एक काव्यकल्पना पण हि ओळ वाचत असताना प्रत्येक वेळी सागर खरोखरच मूर्त रुपात सावरकरांच्या समोर उभा असावा असं मला वाटत राहतं.पण अशी शपथ घालूनही जेव्हा समुद्र उत्तर देत नाही तेव्हा फेसाळलेल्या मिशांनी तो निर्दय जणू आपल्याला बघून हसतच आहे असं सावरकरांच्या आणि वाचकांच्या मानत येतं. तेव्हा मात्र सावरकर सरळ सरळ रोखठोक आणि धीटपणे समुद्राला विचारतात. ‘तू तुझे वचन का मोडतोयस ? तुझ्यावर आरूढ होऊन सर्व जग जिंकणाऱ्या इंग्रजांना घाबरतोयस का ? मग माझ्या आईला ती अबला आहे म्हणून फसवतोयस का? मला का छळतोयस ?’ इथे हि सावरकरांची अस्वस्थता शब्दाशब्दात साठलेली जाणवत राहते.आता मात्र सावरकरांचा बाणा, त्यांच्यातलं सळसळतं रक्त जाणवतं जेव्हा सावरकर म्हणतात ‘ब्रिटीशभूमीला घाबरणार्या घाबरटा माझी मतही अबला नाही.’याचं कारण सांगत असताना सावरकरांचं भारतीय संस्कृतीवरचं प्रेम जाणवतं. कारण भारतीय संस्कृतीमध्ये एक गोष्ट आहे कि अगस्ती ऋषी एका आचमनात संपूर्ण समुद्र प्यायले.सावरकर सागराला जणू धमकावतातच कि ‘अरे वेड्या, जर माझ्या आईला माझा विरह सहन झाला नाही तर ती तिच्या दुसर्या मुलाला, माझ्या अगस्ती नावाच्या भावाला सांगेल आणि तो पूर्वीसारखाच तुला पिऊन टाकेल’ पण हे सांगत असताना सावरकरांनी वापरलेली शब्दयोजना सावरकरांच्या प्रतिभेचं तिसरं उदाहरण. त्यांनी ‘पळी’ असा शब्द वापरला जो दोन प्रकारे घेता येतो, एक आचमनाची पळी आणि दुसरा म्हणजे क्षण. धन्य ते सावरकर, धन्य ती त्यांची प्रतिभा!            असे हे महाकाव्य म्हणजे जणू आर्ततेचा, अस्वस्थतेचा, राष्ट्रभक्तीचा, देशप्रेमाचा, प्रतिभेचा, सृजनाचा अनोखा महासागरच ! या महासागरात पोहत असताना जर प्राण तळमळल्यावाचून राहिला तरंच नवल !                                                                                      - श्रीसर्वेश्वर©

शनिवार, ५ डिसेंबर, २०१५

माफ करा बाबासाहेब....!!!

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर,
माफ करा पण....

१]तुम्ही आयुष्यभर दलितांना उच्चवर्णीयांच्या समान पातळी वर यावं, म्हणून संघर्ष केलात; पण कदाचित या  संघर्षानंच तुम्हांला त्या वर्गापुरतं मर्यादित केलं.

२] तुम्ही समान पातळी आणण्यासाठी आरक्षण योजना स्वातंत्र्योत्तर १६ वर्षांसाठीच राज्यघटनेत लिहीलीत, पण आज या आरक्षणाची शिडी वापरून दलित उच्चवर्णीयांपेक्षा श्रेष्ठ पातळीवर चढले; पण समान पातळी काय आम्ही गाठू शकलो नाही.

३] 'शिका, संघटित व्हा, संघर्ष करा' ही तुमची शिकवण ! ह्यातला पहिला भाग आम्ही कसाबसा पूर्ण केला, पण दुसरा भाग मात्र नाही करु शकलो पुर्ण. मग तिसरा भाग तर सोडूनच द्या.

४]तुमच्या अध्यक्षतेखाली संविधान घडवलं गेलं. पण आमचा 'अविनय कायदेभंग' मात्र अजूनही चालू आहेच.

५] तुम्हांला पुजापाठ मान्य नव्हते, नाही तुम्ही कडाडून विरोधच केलात नेहमी पुजाविधी करण्यासाठी; पण आम्ही मात्र तुम्हांलाही देवत्व बहाल केलं, देव्हार्यात बसवलं, अगदी बोधीसत्त्वांसारखंच.

६] 'सार्या भारताने बौद्ध व्हायला हवं' या तुमच्या शिकवणीतल्या 'बौद्ध' या शब्दाचा खरा अर्थ आम्हांला कधी कळलाच नाही.
[ बौद्ध = वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ]

खरंच तुमची एकही शिकवण आम्ही आत्मसात करु शकलो नाही.
                                           माफ करा बाबासाहेब....!!!
  

गुरुवार, २६ नोव्हेंबर, २०१५

२६/११, अनुत्तरित प्रश्न आणि आशावाद ...!!!

आज २६/११...


या तारखेच्या पाठी साल कुठलंही असू दे; आम्हां भारतीयांना, विशेषतः मुंबईकरांना ते २६/११/२००८च वाटतं.
मग आम्ही फार हळहळतो. कारण याच दिवशी 'कुबेर' नावाच्या बोटीतून ११जण आले आणि त्यांनी कुबेराच्या 'या' नगरी वरच हल्ला केला. त्यात देशी नागरिकांना आणि परदेशी पर्यटकांना वेठीस धरले. मग आमच्या शूर जवानांनी [जवान म्हणजे तारुण्याने, जोशाने, उत्साहाने रसरसलेला तेव्हा यात आमचे पोलीसमित्र सुद्धा आले बरं का] अपुर्या शस्त्रसामग्रीच्या बळावर झुंजवले, शेवटपर्यंत झुंजवले, स्वतःच्या आणि त्यांच्याही! इतकंच नव्हे, तर आत्मघातकी आतंकवाद्यांना मिठी मारणे म्हणजे जणू  मूर्तिमंत मरणालाच मिठी मारण्याचा प्रकार पण आमच्या शुरांनी ते हि केला आणि आत्मघातकी 'कसब'(कसाई) जिवंत पकडला गेला.
व्वा, काय पराक्रम गाजवतला त्यांन.

...
...
...

मान्य, सर्वच मान्य; पण ....     


आज त्या घटनेला ७ वर्षं पूर्ण झालेली असतानाच तत्कालीन अनेक अनुत्तरीत प्रश्न  आज हि अनुत्तरीतच आहेत दुर्दैवाने. म्हणूनच त्यांची उत्तरे शोधण्याचा हा अल्पसा प्रयत्न.

१]  २६/११ मध्ये अपुर्या शास्त्रासामाग्रीमुळे पोलीस हतबल ठरले मग आज पोलीस त्या प्रश्नांतून सुटलेत का ?

- तर नाही; उलट अजूनही पोलीस संशयाच्या धुक्यातच अडकलेत.[नाही, त्यांच्या कार्यक्षमतेमुळे नाही तर त्यांच्यावर सतत येणाऱ्या विविध प्रकारच्या बंधनामुळे]
आजही 'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' म्हणणाऱ्या राकेश मारिया सारख्या अधिकाऱ्यांची बदली होतेच.

२] २६/११ नंतर आता तरी सर्वसामान्य सुरक्षित आहेत का ?

- तर नाही, उलट अधिकच असुरक्षित आहेत. कधीतरी कुठुनतरी whatsapp वर अमुक तमुक  एरियात
 बॉम्ब असल्याची खबर येते आणी सर्वसामान्य धास्तावतात.

पण फक्त ती अफवा विरे पर्यंतच !
मग मात्र पुन्हा आंधळ्यासारखे किंवा मग एखाद्या यंत्रासारखे नित्याच्या राहत्गादाग्याला जुंपून घेतात स्वतःला. पण परत कधीतरी टी अफवा येतेच.
म्हणून च विचारावसं वाटतं कि

३] 'Spirit is OK but what about ALERTNESS?'



असे अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरीत !

त्यांची उत्तरे जेव्हा मिळतील तेव्हाच 'अच्छे दिन आले' असं म्हणता येईल.


पण सगळ्यात महत्वाचा अनुत्तरीत प्रश्न म्हणजे

४] २६/११ च का ? अर्थात त्या आतंकवाद्यांनी २६/११ हीच तारीख का निवडली ?

- उत्तर खरं तर फारच सोप्पं आहे, २६/११ म्हणजे 'भारतीय संविधान दिन' !
पण  २६/११ चे भरमसाठ मेसेजेस WHATSAPP facebook वर फिरत असताना त्यात एकेठी या कारणाचा साधा उल्लेख हि दिसत नाही.
कसा दिसणार म्हणा जिथे रोज आपण आपल्या 'चिरीमिरी' आयुष्यात 'अविनय कायदेभंग चळवळ' र्फाबावत असतोच, तेव्हा  'या'  दिवसाचा मुहूर्त साधून ते आले असावेत याचा पुसटसा अंदाज सुद्धा आम्हांला कसा येईल?
हद्द आहे आमच्या कोडगेपणाची !

आता तर आमच्या या निर्लज्जपणाची सजाच सरकारने नेमक्या याच दिवसाचा मुहूर्त गाठून भारत-पाक क्रिकेट सामने घोष्ट करून


पण तरीही एक आशावाद आहेच कि एक ना एक दिवस आम्ही, भारताचे लोक  एकत्र येऊन ह्या सर्वच प्रश्नांची उत्तरे शोधू आणि 'अच्छे दिन' खेचून आणु!  


-श्री सर्वेश्वर जोशी©
२६/११/२०१५