रविवार, ३ जानेवारी, २०१६

अबोलीचे पत्र : भाग एक

     
प्रति,
Dear ninad.

        मला माहितीय जरी तुला मराठी वाचायचा कंटाळा असला तरीही हे पत्र मी लिहीलंय म्हणून तू ते वाचशीलच.
हं, आता तुला हे पत्र अक्षराला अक्षर लावून वाचावं लागेल पण तु हे पत्र तुझ्या बाबांकडे दे. सॉरी, तू त्यांना 'डॅड' म्हणतोस ना.... तू हे पत्र त्यांच्याकडे दे म्हणजे ते हे पत्र तुला वाचून दाखवतील.

ते तुझ्याच जिज्ञासा विद्यालयात मराठीचे शिक्षक आहेत नं ! खरंतर तुमच्यात वादाची पहिली ठिणगी पडली ती तिथेच.
तू नववीत असताना मित्रांबरोबर शाळेचे तास चुकवून पिक्चरला गेलास आणि नेमकं त्याचवेळेला 'हे' ऑफ-पिरेडला तुझ्या वर्गात गेलेस. घरी आल्यावर ह्यांनी तुला विचारलं त्याबद्दल, आणि सुरु झाली तुमची रोजची वादावादी.
त्यावेळी तुमच्यात जे भांडण झालं ते आजपर्यंत तसंच चाललंय, उलट त्यापेक्षा त्यात कैकपटींनी वाढ झालीय.

तू दहावीत ९५% मिळवलेस, शाळेतून पहिला आलास, त्यावेळी तुझ्या डॅडना इतका आनंद झाला होता की त्यांनी चाळीत सगळ्यांकडे स्वतः जाऊन पेढे तर वाटलेच, पण आपल्या गल्लीतून येणार्या-जाणार्या प्रत्येकाला थांबवून-थांबवून पेढे वाटलेत त्यांनी. त्या वेळचा त्यांच्या चेहर्यावर ओसंडून वाहणारा आनंद आणि अभिमान बघायला तू तिथे हवा होतास रे; पण तू तर त्यावेळी तुझ्या मित्रांबरोबर सेलिब्रेट करत होतास.
मलाही तुला कधी एकदा पाहतेय, आनंदाने, अभिमानाने तुला कधी एकदा जवळ घेतेय असं झालं होतं. तुझ्यासाठी आम्ही कोणीच नव्हतो का रे ? तुला तुझा आनंद आमच्याबरोबर शेअर करावासा वाटला नाही का रे ?
         त्यादिवशी तुझ्या बाबांनी परवडत नसतानासुद्धा मित्रांकडून उधार घेऊन 'फाईव्ह स्टार' हॉटेलमधलं टेबल बुक केलं होतं. आम्ही तुझीच वाट बघत होतो. पण तु त्या रात्री पहिल्यांदा दारु प्यायलास. नाही, तु स्वतःहून नाही पिणार ही खात्री आहेच मला, तुला तुझ्या मित्रांनीच पाजली असेल. तु त्या रात्री घरी आलास, तोच दारुच्या नशेत, आमच्याशी न बोलता चक्क तू बेडरुममध्ये गेलास आणि झोपून गेलास. आम्ही त्या दिवशी उपाशीच झोपलो रे ! पण आम्हांला दोघांनाही आम्ही उपाशी होतो याचं काहीच वाटत नव्हतं पण तु काही खाल्लं असशील का ? तू काय खाल्लं असशील ? त्याचा तुला त्रास तर होणार नाही नं ? असे अनेक प्रश्न भेडसावत होते.
दुसर्या दिवशी तू उठायच्या आधीच नेहमीप्रमाणे आम्ही उठलो, तेव्हा आमच्या डिस्कशनचा विषय होता 'तुझं फ्युचर'.
          आम्हांला तुझी उच्च स्वप्नं माहित होती पण आपण चार आणि आजी-आजोबा, काका-काकू असं आठ जणांचं कुटुंब त्या दुष्काळाच्या वर्षी सांभाळणं आणि त्यात तुझ्या उच्च स्वप्नांसाठी फी भरणं हे परवडणारं नव्हतं. हा सगळा विचार तुझे डॅड करत असतानाच तू उठलास. ते खरं तर तुझाच विचार करत होते, पण 'तुम्ही माझ्या सक्सेसने हॅप्पी झालातच नाहीत' 'तुम्ही माझा विचार कधीही करत नाही' हे ही म्हणायलासुद्धा तू कमी केलं नाहीस.
             सेंट जोसेफ ची एन्ट्रन्स एक्झाम देऊन तिथे ऍडमिशनही मिळवलंस , पण फीसाठी पुरेशी रक्कम न मिळाल्यामुळे तुला ते ऍडमिशन रद्द करावं लागलं होतं. तेव्हा तु घरी आल्यावर मागचा-पुढचा कुठचाही विचार न करता, धिंगाणा घातलास. पण त्या रात्री तुझ्या बाबांची आसवांनी चिंब भिजलेली उशी मी बघितलीय. हं, आता तुझा यावर विश्वास बसणार नाहीच म्हणा.

तु रावसाहेब सरपोतदार कॉलेज मध्ये जाऊ लागलास, तुझ्या बाबांकडून तुला मिळालेल्या डिएनएंपैकी एक डिएनए जिथे जाशील तिथे स्वतःचं अस्तित्त्व निर्माण करायचा. त्या डीएनएचा तू इथेही वापर केलास. त्या सायन्स कॉलेजमध्ये होणारं रॅगिंग थांबवलंस. इतकंच नव्हे, तर तिथे 'लिटरेचर क्लब' स्थापन केलास. अनेक सिनिअर मेंबर्स असूनही त्या क्लबचा प्रेसिंडेट झालास.

ही लँग्वेजबद्दलची पॅशनसुद्धा तुझ्याकडे तुझ्या डॅडकडूनच आली होती नं ! हं, पण तुझे बाबा 'माता मातृभाषाश्च स्वर्गादपि गरीयसी' अशा मताचे तर तु 'ENGLISH IS MUST TO LIVE IN TODAY's WORLD'  या मताचा ! हाही तुमच्यातला भांडणाचा एक महत्त्वाचा मुद्दा !

त्या लिटरेचर क्लबमध्येच तुझी पहिली क्रश तुला भेटली. तु तिला बघताक्षणीच तिच्या प्रेमात पडलास, पण ती मात्र तुझ्या डॅडसारखीच बुरसटलेल्या विचारांची होती असं तुच  नंतर म्हणालास.

    तिच्याशी ब्रेकप झाल्यावर तुझे जे कॉलेजमधले मित्र होते त्यांनी तुला 'ड्रिंक्स' 'सिगरेट'ची सवय लावली. अजुनही तु त्या सवयीतून बाहेर आला नाहीस. सुरुवाती-सुरुवातीला आमच्यापासून हे सगळं लपवणारा तू, नंतर तर चक्क आम्ही घरी नसताना चक्क घरी आणून पिऊ लागलास. तुझ्या अनेक बाटल्या मी तुझ्या डॅड पासून लपवुन टाकून दिल्या, अजूनही टाकते. कारण ह्यांचा दारुवरचा राग बघून मला भिती वाटते की तुला हे घराबाहेर तर काढणार नाहीत नं !

ह्या लिटरेचर क्लबमध्ये तुला वाचनाची भूक लागली. तु प्रचंड पुस्तकं वाचलीस, या वाचनातूनच असेल कदाचित पण या काळात प्रत्येक गोष्टीबद्दलचा तुझा स्टँड अधिक व्यवहारी, अधिक व्हिजनरी, आणि अधिक जेनेरिक झाला. पण प्रत्येक गोष्टीतून पैसा कसा काढता येईल याचा विचार तू करु लागलास.

तुझे डॅड समाजकार्य करायचे. तु जेव्हा डॅडना म्हणालास की 'हे कसले भिकारचोट धंदे करताय' तेव्हा तुझी बदललेली भाषा, बदललेला दृष्टिकोन बघून तुझ्या बाबांनी तुझ्यावर हात उचलला. तुला थोपटून थोपटुन त्यारात्री माझा तुझ्याच खोलीत डोळा लागला. रात्री जेव्हा जाग आली तेव्हा ह्यांनी दहावेळा स्वतःच्या थोबाडीत मारुन घेतलेलं मी बघितलंय.

बारावीत सुद्धा तु ९०% मिळवलेस, त्यावेळी मात्र एज्युकेशनल लोन काढून सेंट जोसेफ मध्ये तुला ऍडमिशन घेतलं. त्यावेळी खुश होण्याऐवजी 'तुम्ही माझ्या शिक्षणाचा खर्च सुद्धा करु शकत नाही का?' असं म्हणालास.

कॉलेजच्या इव्हेंटमध्ये सुद्धा तू ऑर्गनायजिंगची कामं करत होतास. त्याचवेळी तुला 'लावण्या' भेटली. तु तिच्यासाठी वेडाच झालास, ती मात्र तुझ्याकडे एक चांगला मित्र म्हणूनच बघत असावी कदाचित.
पण तरीही तु तिला विचारलंस, 'तुला कसा बीएफ हवाय" तिच्या त्यावेळचं उत्तर होतं "तुझ्यासारखा हँडसमच हवा, मला समजून घेणारा हवा, माझ्यासाठी कधीही काहीही करायला तयार असणारा हवा. पण त्याच्याकडे भरपुर पैसा हवा, त्याने माझ्या आयुष्यात येताना 'रॉयल एनफिल्ड'वरुनच एन्ट्री घ्यायला हवी.' या तिच्या उत्तराने तुमच्यातले वाद विकोपाला गेले.
तुला 'रॉयल एनफिल्ड' हवी होती, त्यावेळी आपली तेव्हढी ऐपतच नव्हती. त्यातूनच शब्दाला शब्द लागला, वादाने वाद वाढत गेला, आणि तुझ्या डॅडनी तुझ्यावर पुन्हा एकदा मनात काहीही नसताना हात उचलला. तु यावेळी इतका चिडला होतास की डॅडचा हात हवेतच पकडून तो झिडकारायलाही तु मागे-पुढे पाहिलं नाहीस.

त्यानंतर तुम्ही दोघंही एकमेकांशी एका अक्षरानं सुद्धा बोलला नाहीत, अजूनही बोलत नाही तुम्ही दोघं. पण तुम्ही एकमेकांशी बोलण्यासाठी माझा पोस्टमन म्हणून नेहमीच वापर करता.

या सगळ्या वादावादी मध्ये मी मात्र कधीच एका शब्दानेही माझ्या मनातलं तुमच्याशी बोलले नाही, तुम्हां दोघांमधले वाद कधी आणि कसे मिटतील याचाच नेहमी विचार केला. नावाप्रमाणेच 'अबोल' आयुष्य जगले. पोस्टमनचं काम करताना स्वतःचं वेगळं अस्तित्त्व दडपण्याचा प्रयत्न केला. पण आता मात्र हे सगळं असह्य झालंय. आता मात्र तुमच्या दोघांमधली ही पोस्टवुमेन हे जग सोडून चाललीय.
I still have hopes that you both will be come together after my death.

                                                     - तुझीच आई,
                                      (SORRY), YOUR MOM
                                               सौ. अबोली महाशब्दे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा