रविवार, १३ मार्च, २०१६

प्रति,
‪#‎प्रिया‬                                                                                                               

काय योगायोग आहे नं ? मी ऑनलाईन यायला आणि तू ऑफलाईन जायला एकच गाठ पडते हल्ली.
पण मलाही आताशा वाटू लागलंय कि तू बहुधा हे सारं मुद्दाम करत असावीस.नाही, म्हणजे तू हे जाणूनबुजून करत नसशीलही; पण आपलं मन वेडं असतं नं !
कुठल्याही प्रकारावर कुठल्याही पाली ('शंकेच्या' गं) चुकचुकत राहतात आणि आपल्या मनावर त्यांचंच राज्य आहे हे जाणवून द्यायचा प्रयत्न करतात.
आज बरोबर दोन वर्षं झाली. फेबुवर तूच मला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवलीस.तुझा तो प्रोफाईलफोटो बघितल्यावर मला राहवलंच नाही. मग काय केली रिक्वेस्ट ऍक्सेप्ट ! खरंतर तुझ्यासारख्या अनोळखी मुलीने रिक्वेस्ट पाठवणं मला थोडंसं आश्चर्यकारक होतं.
मग नित्यनेमाने चॅट्स घडू लागले, त्यातूनच आपण दोघं एकमेकांना उलगडत गेलो, एकमेकांसाठी घडत गेलो आणि इतरांसाठी बिघडत गेलो. माझी प्रत्येक आवड-निवड तुला पाठ होत गेली, तुझी मला.इतकंच काय, एखादी बातमी 'ब्रेकिंग न्यूज' म्हणून वारंवार ब्रॉडकास्ट होताना पाहिलीस कि मग आपल्या चर्चा व्हायच्या. अनेकदा मी व्यक्त होण्याअगोदरच तू माझी मतं मलाच सांगू लागलीस. इतके आपण जवळ आलो होतो. जवळ येता येता प्रगल्भ होत होतो. मग आपली भेट झाली, फार पूर्वीपासूनच अनेकांसाठी लव्हपॉईंट ठरलेल्या दादर चौपाटीवर. आपल्या बाजूचे अनेकजण, अनेक जोडपी ती तसली 'लव्हाळी' वाढवत होती.
आपण मात्र प्रत्यक्षात पहिल्यांदाच भेटत होतो. पहिल्यांदाच भेटत असलो तरीही भेटीत पहिलेपणा, नवखेपणा अजिब्बात नव्हता. कारण सोशल मिडीयाच्या  माध्यमाने आपण आधीच एकमेकांच्या जवळ येत होतो. पण तरीही लग्न होईपर्यंत आजूबाजूच्या 'लव्हाळ्यां'सारखं कधीच काहीच करायचं नाही हे तू तुझ्यापुरत ठरवलं होतंस आणि त्यावेळि मलाही ते मान्य होतं.
मग काय आपल्या भेटी वाढत गेल्या, मुंबईतला एकही लव्हर्स पॉईंट असा नाही जिथे आपण एकत्र गेलो नाही.
पण चार महिन्यांपूर्वी माझं काय बिनसलं होतं आठवत नाही.
(खरंतर तो दिवसहि आठवायचा नाही मला; पण आठवण्यासाठी आधी विसरावं लागतं)
पण मी तुला कधीच बोलू नये ते बोलून गेलो. खरंतर सुरुवातीची ५मिनिटे तू मला समजावण्याचा थांबवण्याचाही प्रयत्न केलास पण ते नाही जमलं तुला.अगदी तूच पुढाकार घेऊन ओठांवर ओठ ठेवलेस तरीही ते सुटल्यावर मी शांत राहिलो नाही. उलट तुझ्या कानफडात लावली.
मी नियंत्रणाबाहेर आहे हे लक्षात आल्यावर तू निघून गेलीस  आणि याचाच मला जास्त राग आला.
तू मला सोडून गेलीस ह्यामुळे माझी अवस्था फार बिकट झाली. परंपरांचा वारसा जपणाऱ्या घरात माझं हे 'लव्हलफडं' कळल्यावर मला घरातून बाहेरच काढलं असतं.म्हणूनच घरच्यांना काहीही जाणवू न देण्याचा प्रयत्न केला. पण या काळात मला एकटं रहावसं वाटत होतं आणि असा एकच वेळ होता माझ्याकडे.झालं, कॉलेज बंक करून शांत ठिकाणी जाऊन बसू लागलो एकटाच.त्यामुळे परत माझ्या नुकसानात भरच पडली.शेवटच्या वर्षाचा अभ्यास सुटला.
      शेवटचं वर्ष हातातून जाण्याच्या बेतात असतानाच तुला एका मुलाबरोबर बघितलं आणि तुला भेटायला म्हणून तुझ्यासमोर आलो. "हा राजेश, ह्याच्याशी माझं लग्न ठरलय" इति तू . मी तरी काय बोलणार होतो ?? फक्त एवढच म्हटलं "शुभेच्छा" ! त्यानंतरच हा योगायोगाचा खेळ सुरु झाला. म्हणूनच म्हटलं मगाशी कि बहुधा हे सारं तू मुद्दाम करत असावीस असं वाटतं ह्ल्ली. तुझ्या लग्नाआधी मला तुला एकदा भेटायचंय. नाही, पुर्वीसारख नाही, तुझी माफी मागायला,  तुझी परवानगी असेल तर तुझ्या कुशीत येऊन रडायला तुला तुझ्या उर्वरित आयुष्याच्या शुभेच्छा द्यायला.  आणि एक वचन द्यायला कि  "मी तुझ्याशिवाय हि आनंदात राहायचा प्रयत्न करीन" कारण मला माहितीय मी आनंदात नसेन तर तुही सुखी होणार नाहीस आणि मी तुझ्या सुखासाठी स्वतःचा जीव ओवाळायलाहि तयार आहे.
तुझ्याशिवाय कोणाचाच नसलेला,
प्रेम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा