बुधवार, २२ जून, २०१६

आस्तिकता & नास्तिकता : महाचर्चा (भाग १)

"एक ओर से ये दुनिया को देख लो ये जरुरी नही"

कुठल्याही वादविवाद स्पर्धेत प्रतीवादाला सुरुवात करताना शोभेल असं 'हे' वाक्य ! कारण मुळात स्पर्धक इतरवेळी कुठल्याही बाजूने किंवा सारासार विचार करत असला तरीही 'त्या' कालावधीमध्ये त्याला एकच बाजू पटवायची असते, स्वतःला कितीही पटत नसले तरीही !पण फेसबुक सारख्या माध्यमात अशा एखाद्या स्पर्धकमित्राने, त्यातहि तुझ्यासारख्या स्वतंत्र विचारांच्या माणसाने सारासार न करता एखादं मत मांडणं आणि त्यावर मला हे वाक्य वापरावं लागणं हे माझ्यासाठी खरंतर अनपेक्षित आहे.

विषयावर येण्यापूर्वी एक सांगतो, 'मूळ आणि सर्वार्थाने योग्य' हि संकल्पनाच मुळात व्यक्तीसापेक्ष आहे.

माझी बाजू मांडण्यापूर्वीच हे सांगतो कि मी आस्तिकतेच्या आणि नास्तिकतेच्या, दोन्ही बाजूंच्या वेगवेगळ्या बाजूंच्या वेगवेगळ्या पातळ्यांमधून गेलो आहे. मुळात जन्म टिपिकल ब्राह्मण घरातला, त्यामुळे पूजा वगैरे ह्या सगळ्यावर ४थिपर्यंत प्रचंड विश्वास. त्यानंतर साधारण ५विपासून वाचनाला केलेली सुरुवात आणि त्यातून येत गेलेली समज, यांमुळे आस्तिकता-नास्तिकता यांच्यातलं मनात चाललेलं द्वंद्व, त्यानंतर एका वेगळ्या पातळीवर विचार केल्यानंतर आलेली नास्तिकता आणि त्यातून पुन्हा रंगलेलं द्वंद्व, आणि त्यानंतर संपूर्ण विचारांती भरकटलेल्या, स्वतंत्र विचार न करू शकणार्या भाबड्या माणसांना देवाची असलेली गरज मान्य करणं आणि त्याच बरोबर एका अनोख्या, अद्भुत, अनाकलनीय आणि तरीही अज्ञात चैतन्याचं अस्तित्व मान्य करणं (ह्यालाच 'भक्त' देव/गॉड/जीजस/अल्लाह वगैरे म्हणतात बरं). असा हा सारा प्रवास ! ह्या प्रवासात अनेक जण भेटले देवाच्या, स्वतःच्या शोधात असलेले; स्वतःला देवाला किंवा स्वत्वाला वाहून घेतलेले.ते सारेच आज आठवले, तुझ्या ह्या पोस्ट ने !आणि म्हणूनच त्या सार्यांच्या साक्षीने उत्तर देतोय.

मुळात टोकाची आस्तिकता आणि टोकाची नास्तिकता दोन्हीही मानसिक विनाशाला आणि मानसिक दुबळेपणाचे द्योतक आहेत. फक्त भाबडा देवभक्त आस्तिक हे मान्य करतो कि तो दुबळा आहे आणि नास्तिक आस्तिकांना भाबडं, वेडं वगैरे सिद्ध करण्यात आपली वैचरिक क्षमता सिद्ध करतोय वगैरे अशा भाबड्या समजुतीत हे सिद्ध करून जातो.

जे भाबडेपणाने आस्तिक होतात आणि इतरांचे अनुकरण करत एखाद्या देवाला मानतात, पूजतात ते देवाबाबतच्या प्रश्नांना टाळण्याचा आटोकाट प्रयत्न असतो. पण मुळात जे खरंच ज्ञानी आस्तिक आहेत ते उलट अशा वादविवादांची वाट बघत असतात. तसंच ते नास्तिकांना बावळट न ठरवता केवळ मार्ग चुकलेले म्हणतात आणि त्यांच्यापैकी काही तर नास्तिकतेचा मार्ग वेगळा असूनही त्यांचा आदर करतात.

आता उर्वरित कर्मठ आस्तिकांनी नास्तिकांना बावळट म्हटलेलं असताना नास्तिकांनी त्यांच्याकडे किती लक्ष द्यावं हा प्रश्नच आहे. पण एक सांगतो, मी बघितलेले असे कर्मठ आस्तिक कधीही स्वतःहून नास्तिकांच्या नास्तिकतेवर बोट ठेवत नाहीत, उलट नास्तिक मात्र आस्तिकांच्या आस्तिकतेवर बोट ठेवण्याची संधीच शोधत असतात.

मुहम्मद सफदर अल् अफगाणी याचा मुद्दा उपस्थित करत असताना तुला असे नास्तिक दिसत नाहीत का जे देवाचं अस्तित्व तर नाकारतात, पण एखाद्या महान व्यक्तिमत्वावर श्रद्धा ठेवतात. आता हि व्यक्तीपूजा म्हणजे त्या व्यक्तीला देवत्व बहाल करणं नव्हे का ? पर्यायाने आस्तिकता नव्हे का ?

मी असे आस्तिक बरेच पाहिलेत, ज्यांच्या श्रद्धा, निष्ठा ह्या त्यांच्यापुरत्या मर्यादित असतात. पण असे नास्तिकहि बरेच पाहिलेत जे इतरांच्या निष्ठा, श्रद्धा कशा खुळचट आहेत, हे त्यांना पटवून देऊन स्वतःच्या मार्गावर आणण्याच्या अट्टाहास करत असतो. आता हा स्वतःचे महत्त्व पटविण्यासाठी इतरांच्या श्रद्धा, निष्ठा वापरण्याचा प्रकार नव्हे का ?
राहिला प्रश्न महाभारतातील, कुराणातील, बायबल आणि तत्सम इतर धर्मग्रंथातील मधील पात्रांचा, त्यांच्या अचाट, अमानवी ताकदींचा, शक्तीचा, सामर्थ्याचा !

मला एक सांग, हॉलीवूडमधले 'ऍव्हेन्जर्स' किंवा तत्सम काय ? बॉलीवूडमधल्या किंवा दाक्षिणात्य चित्रपटातल्या कुठल्याही अॅक्शनपटातले 'हिरो' काय ? हे सारे प्रेक्षकांना का आवडतात; कारण त्यांची अचाट, अमानवी ताकद/शक्ती/समर्र्थ्य !मग देवाचं अस्तित्व पटविण्यासाठी थोड्याशा अचाट, अमानवी कल्पनांना मूर्त रूप दिले तर बिघडले कुठे ?
तुला, मला त्या नाही पटत ना ? मग देऊया कि सोडून ! मुळात रामायणातला अचाट अमानवी 'हनुमान' आणि अग्निदिव्य वगैरे भाग वगळला तर रामायण हे आदर्श ठरत नाही का ?

मुळात एक सांगतो, ह्या जगत अशी कोट्यावधींची लोकसंख्या आहे, जे तुझ्यासारखा वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगत नाहीत, सारासार विचार करू शकत नाहीत; अशा लोकांसाठी, अशा लोकांमुळे देव हि संकल्पना रूढ झाली. दुर्दैवाने ह्या २१विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात ही शांत आणि श्रांत समाजजीवनासाठी भाबड्या, अज्ञानी लोकांना देवाची मानसिक गरज आहे, आपल्याला नसली तरीही.

तेव्हा उगाच इतर सामान्य नास्तीकांप्रमाणे न वागता पुन्हा एकदा सारासार विचार कर आणि मग बघ, नक्कीच तुझ्या मतात फरक पडेल.

सर्वात शेवटी हे सांगतो कि; आस्तिकता काय किंवा नास्तिकता काय, दोन्ही गोष्टी म्हणजे मिरवायचे दागिने नव्हेत तर स्वतःची वैयक्तिक मते आहेत. तेव्हा स्वतःला 'माणूस' म्हणत असाल तर ह्या गोष्टी स्वतःपाशीच ठेवून माणुसकीने वागा; जगा आणि जगू द्या.


© - सर्वेश्वर जोशी

शुक्रवार, १७ जून, २०१६

पु ल : एक अपूर्वाई

पु ल हि दोनच अक्षरे ! पण त्यात संपूर्ण महाराष्ट्राच्या खळखळत्या हास्याचे प्रवाह साठलेले आहेत.

खरंतर हि पोस्ट लिहितोय ती पुलंच्या स्मृतिदिनाबद्दल, पण खरं सांगायचं तर हा माणूस आजही जिवंत आहे, आजही संबंध महाराष्ट्राला खळखळवून हसवतो आहे.

पु ल हि फार मोठी असामी असली तरीही त्यांना अक्खा महाराष्ट्र, अगदी माझ्या आजी-आजोबांपासून ते माझ्या भाच्या पर्यंत सारे बोलावतात ते 'भाई' म्हणून. कारण हि 'आपुलकी' त्यांनीच निर्माण केली आहे. 

आपल्या लेखनातून वाचकांशी 'मैत्र' साधण्याची विलक्षण हातोटी पुलंमध्ये होती.

पु ल 'अष्टपैलू' होते हे मी म्हणणार नाही. कारण अष्टपैलू म्हटलं तर 'आठ पैलूंची मर्यादा येते. पण पुलंच्या व्यक्तिमत्वाला एवढे पैलू होते कि पुलंचं वर्णन करण्यासाठी 'अष्टपैलू' हा शब्दही थिटा पडेल.

तरीही पु ल ह्या हिमनगाचे आपल्याला समुद्रावर तरंगताना दिसणारे टोक म्हणजे त्यांचे विनोदि लेखन हे मान्य करायलाच हवं.

पुलंनी फक्त वाचकाला हसवलंच नाही, तर हसवता हसता दुःखावर, स्वभावातील त्रुटींवर नेमकेपणानं बोट ठेवणाऱ्या पुलंनी; हसवता हसवता वाचकाला अंतर्मुख केलं. पण हे करत असताना पुलंनी आपल्याकडून कधीही आगळीक घडू दिली नाही, त्यांनी कधीही एखाद्या शारीरिक व्यंगावर विनोद केला नाही. ह्यातच पुलंच्या संवेदनशीलतेचा दर्जा सिद्ध होतो.

पुलंनी मराठी साहित्यातील विनोदी लेखन, कथा, प्रवासवर्णने, भाषांतरे, कादंबऱ्या, नाटके, प्रहसने, व्यक्तिचित्रे, एकांकिका अशा विविधांगी क्षेत्रात आपल्या लेखणीने थैमान तर घातलेच पण त्याच बरोबर चित्रपट, नाट्यसृष्टी, संगीत अशा अनेक क्षेत्रात 'अपूर्वाई' घडवली.

आजीला आवडणाऱ्या 'इंद्रायणी काठी' पासून ते भाच्याला आवडणाऱ्या 'नाच रे मोरा' पर्यंत विविध बाजाच्या, वयोगटाच्या गाण्यांना पुलंनी संगीतबद्ध केले.
पु ल पेटीवर बसले कि त्यांच्या बोटांमध्ये 'जादू' शिरायचे आणि श्रोता हरपून जायचा.
त्याचबरोबर तबल्यावर बसलेले असताना ते कुठल्याही गतीत, कुठल्याही तालात आपले सामर्थ्य सिद्ध करायचे.
म्हणूनच त्यांचे जगणे म्हणजे एक प्रकारचं विविधांगी संगीतच होतं असं म्हटलं तरीही वावगे ठरू नये.

पुलंचं तिसरं क्षेत्र म्हणजे नाटक !!
अगदी लोकनाट्यापासून ते सामाजिक नाटकापर्यंत वेगवेगळ्या धरतीची, बाजाची नाटकं पुलंनी लिहिलीच पण अनेक नाटकांमध्ये स्वतः दिग्दर्शन आणि अभिनयहि केला.
पुलंच्या नाटकांतील 'फुलराणी' हे आजही जवळजवळ प्रत्येक अभिनेत्रीचं स्वप्न आहे.

आपल्या विनोदी लेखनाचे सादरीकरण करत पुलंनी मराठी स्टँडप कॉमेडीचा पाया रचला.

पुलंनि महाराष्ट्रभर कथाकथनाचे कार्यक्रम करून महाराष्ट्रात कथालेखनातील एक वेगळा बाज रुजवला.

पुलंनी 'उपदेशपांडे' अर्थात सुनीताबाईंबरोबर केलेल्या काव्यवाचनाच्या कार्यक्रमांमुळे बा सी मर्ढेकरांची 'नवकविता' महाराष्ट्राला समजली.

पुलंनी अनेक अनोखे कार्यक्रम नभोवाणी आणि दूरदर्शन वर सादर केले.

पुलंचं तिसरं महत्वाचं क्षेत्र म्हणजे चित्रपट !!!
पुलंनी अनेक चित्रपटांसाठी लेखन केले, अनेक चित्रपट संगीतबद्ध केले, अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले.
पण 'गुळाचा गणपती' हा सुप्रसिद्ध चित्रपट आजही 'सबकुछ पु ल' म्हणूनच ओळखला जातो. कारण ह्या चित्रपटात कथा, पटकथा, गीते, संगीत, दिग्दर्शन, अभिनय अशा विविध भूमिका गाजवून पुलंनी त्यांच्यातला 'कल्लाकार' सिद्ध केला.

अशा ह्या कलंदर माणसाचा दूरदृष्टी हा एक वैशिष्ट्यपूर्ण गुण !! पुलंच्या सावरकरांविषयीच्या आणि इतर भाषणांतून 'वक्ता दशासहस्त्रेषु' पु ल तर दिसतातच पण त्यांच्या ह्या हि गुणांची झलक पहायला मिळते.

अशा ह्या प्रचंड प्रतिभेच्या साहित्यिकाने अनेकांना आयुष्यावर प्रेम करायला शिकवलं. 'या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम कसे करावे ?' हे पुलंनी शिकवलं. म्हणूनच आत्महत्येला गेलेले अनेक जण पुलंचं साहित्य वाचून माघारी फिरले. हे सामर्थ्य होतं पुलंचं !!!


ह्या अशा असामी बद्दल मला नेहमीच एक प्रश्न पडतो,
"अनंत हस्ते देता पुरुषोत्तमाने
किती रे घेशील दोन कराने ??"

- सर्वेश्वर

प्रवास

साधारण १७-१८ वर्षांपूर्वीचा असाच एक दिवस. जूनच्या पहिल्या पंधरवड्यातला एखादा ! बहुधा पावसाची रिमझिम हि सुरु झाली असावी, कारण त्यावेळी पाऊस आत्ता एवढा बेशिस्त झाला नव्हता.

आणि अशातच गुलाबी रंगाचा हाफशर्ट, मरून रंगाची हाफ पँट, पाठीला रंगीत 'दप्तर', त्यात पाटी-पेन्सिल, गळ्यात अडकवलेली वॉटरबाग, आणि शर्टाच्या खिशावर रंगीबेरंगी हातरुमाल अशा अवतारात 'कोणीतरी' अंगणवाडीत पाय ठेवला. आणि आई निघून जाताच त्या बाळाच्या डोळ्यांतून मुसळधार बरसात सुरु झाली.

हळूहळू 'तो' मुलगा रमला, खेळण्यांतून 'प्ले थेरपी' अनुभवू लागा, बड्बडगीतांतून भाषा त्याला ओळखीची होऊ लागली, अंक-अक्षरे गिरवण्यात त्याला एकप्रकारची वेगळी मजा येऊ लागली आणि बघताबघता 2 वर्षे सरली.

पुढे एखाद्या जूनच्या पहिल्या पंधरवड्यातल्या अशाच एका दिवशी त्या चारभिंतीच्या शाळेतून 'त्या' मुलाची चार मजल्याच्या शाळेत बदली झाली. पण 'शिशु' असल्याने शिकवण्याची पद्धत साधारण तशीच होती. पण मित्र मात्र नवीन होते. त्याचबरोबर 'अंकलिपी' नावाच्या नव्या गोष्टीशी ओळख झाली. त्यामुळे त्यातही एक वेगळी मजा होती.

पुढे एखाद्या जूनच्या पहिल्या पंधरवड्यातल्या अशाच एका दिवशी तो 'शिशु' मोठा झाल्यावर त्याचा 'बालभारती'त प्रवेश झाला. आता मित्र तेच असले तरीही पाटी-पेन्सिल हा विषय पूर्णतः बाद करून दुरेघी वही आणि शिसपेन्सिल या वस्तू ओळखीच्या झाल्या. बड्बडगीते जाऊन छोट्यांचे धडे आणि कविता आल्या. सोबतच बाळबोध इंग्रजी आली. असेच दिवस जात राहिले.

पुढे एखाद्या जूनच्या पहिल्या पंधरवड्यातल्या अशाच एका दिवशी 'तो' मुलगा तिसरीच्या वर्गात जाऊन बसला.
दुरेघीची एकोळी वही झाली; चौकट वही हा विषय संपूर्णतः बंद झाला. परिसर अभ्यास हा विषय जाऊन सामान्य विज्ञान, इतिहास-भूगोल असे विषय आले. असेच दिवस जात राहिले.

पुढे एखाद्या जूनच्या पहिल्या पंधरवड्यातल्या अशाच एका दिवशी 'तो' गोंडस मुलगा प्राथमिक शाळेतून माध्यमिक शाळेत प्रवेश करता झाला. हळूहळू साहित्यिकांच्या कथा आल्या, कवींच्या कविता आल्या.
बाकीचे विषय आपली पातळी वाढवत राहिले.

आश्चर्य म्हणजे माध्यमिक शाळेच्या पहिल्याच वर्षात 'त्या' मुलाने प्रथम क्रमांक पटकावला आणि त्यापुढे प्रत्येक वर्षात तो आपली हुशारी दाखवत राहिला. प्रत्येक वर्षी स्नेहसंमेलनात भाग घेत राहिला, कधी लेखक म्हणून तर कधी दिग्दर्शक म्हणून. असेच दिवस जात राहिले.

पुढे एखाद्या जूनच्या पहिल्या पंधरवड्यातल्या अशाच एका दिवशी दहावीचा रिजल्ट हातात आला. ८०% मिळाले आणि 'त्या' मुलाची शाळा कायमची सुटली.

मग त्याने नव्या आयुष्यात पदार्पण केलं. 'कॉलेजगोअर्स' म्हणून 'त्या' मुलाचं प्रमोशन झालं. आधी कधी एकटाच बाहेर न पडलेला 'तो' रोज लोकल/बसने कॉमर्स कॉलेजला जाऊ लागला. एक वेगळं प्रकारचं आयुष्य जगू लागला. पण तरीही हे कॉलेज मराठमोळं होतं. असेच दिवस जात राहिले.

पुढे एखाद्या जूनच्या पहिल्या पंधरवड्यातल्या अशाच एका दिवशी १२वीचा रिजल्ट हाती पडला, ६७% नि पास झाला. नव्या अभ्यासक्रमात प्रवेश झाला. हे कॉलेज नवीन होतं. वातावरण मॉड होतं. सेमिस्टर पॅटर्न त्यामुळे बराच अभ्यास होता. पण 'तो' मुलगा मात्र अभ्यासापेक्षा इतर गोष्टीतच रमत होता. असेच दिवस जात राहिले.


पुढे एखाद्या जूनच्या पहिल्या पंधरवड्यातल्या अशाच एका दिवशी १५-१६ वर्षांपूर्वी शाळेत जायचं नाही म्हणून रडणारा 'तो' मुलगा शाळेत/कॉलेजमध्ये जायला मिळणार नाही म्हणून वाईट वाटून घेत माझ्यासारखाच बसला होता.
नव्हे, 'तो' मुलगा मीच होतो.

आता हा प्रवास पूर्णत्वास गेलाय, पण ह्या प्रवासाने माझं आयुष्य समृद्ध केलंय. ह्या प्रवासात जे जे माझ्या सोबत होते त्या साऱ्यांचे ऋण मानण्यापेक्षा त्यांच्या ऋणातच राहणं मला अधिक प्रिय आहे.

-सर्वेश्वर जोशी