मंगळवार, २९ ऑगस्ट, २०१७

'तो' एक बाप होता.

आज संध्याकाळी मध्य रेल्वेवर लोकल्स ठप्प झाल्याचं कळलं आणि आज दुपारी २.३०च्या दरम्यान अनेकदा भेटलेला 'तो' माणूस  आठवला. तसे  आम्ही आज दुपारी ३-४ तास एकत्रच होतो, पण 'त्या' काही क्षणांपुरता 'तो' माणूस कोणीतरी वेगळाच होता. नाही, तसा वेगळा म्हणजे कोणी 'सुपरहिरो' वगैरे नव्हे, तर तो 'त्या' क्षणांपुरता इतर काही नसून एक सर्वसामान्य 'बाप' होता. त्याचा म्हणजे खरंतर त्याच्यातल्या बापाचा हा  आजच्या दिवसाचा प्रवास !

तसा तो एक डोंबिवलीपल्याडचा सर्वसामान्य, मराठमोळा नोकरदारच होता, पण आजचा दिवस त्याच्या मधल्या 'बापा'चा होता. ह्याचं कारण म्हणजे त्याच्या लाडक्या आणि एकुलत्या एक मुलीचा आज १२वी चा रिझल्ट होता. सकाळी सकाळी नेहमीच्या वेळी घरातून निघताना त्याने झोपलेल्या तिला एकदा चिंतीत नजरेनं  पाहिलं आणि स्वतःशीच म्हणाला  "काही झालं तरीही हि नापास होणार नाही, आपल्या परिस्थितीमुळे आपण तिला एखाद्या मोठ्या क्लासला लावलेलं नसलं म्हणून काय झालं ???" एवढं पाठबळ सुद्धा तो तिला 'ती' जागी असताना देऊ शकला नव्हता. कारण नेमका कालच अतिकामामुळे त्याच्याकडे  उशिरा घरी उशिरा पोहचण्या शिवाय दुसरा उपाय नव्हता.

१० वाजल्यापासून ऑफिसमध्ये काम करत होता हे खरं, पण त्याचं लक्ष मधूनमधून सारखं घड्याळावर जात होतं. घड्याळात एक वाजायची तो जितक्या आतुरतेने वाट बघताना त्याला ओटीबाहेरचा तो आठवत होता.  एक म्हणजे खरंतर त्याचा लंच टाईम ! पण मित्र जेवणासाठी बोलवायला आले, तेव्हा त्यानं सांगितलं, "मुलीचा रिझल्ट बघितल्याशिवाय एकही घास माझ्या घश्याखाली उतरेल असं वाटतं तुला ?"

मित्राला असं सांगून तो रिझल्ट बघायला कम्प्युटर कडे वळला खरा पण साईट हँग होती, काहीच दिसत नव्हतं. बहुतेक हजारो लोक एकाचवेळी ऑनलाईन आल्याने झालं असावं असं समजवत तो प्रयत्न करत राहिला. पंधरावीस मिनिटं झाली असतील, तरीही सर्व्हर डाऊनच होता; तितक्यात त्याचा फोन वाजला.

मुलीचाच फोन होता, ७० % मिळाले होते, त्याच्या डोळ्यात तरळलेलं पाणी लपवायचा एक व्यर्थ प्रयत्न केला त्याने, पण त्याच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद ते अश्रू नसून सुखाश्रू होते ह्याची ग्वाही देत होता. फोन झाल्यावर तो इतक्या आनंदात ओरडला कि शेजारच्या कॅन्टीनमध्ये डबे खाणारे त्याचे मित्र धावून आले. त्याने सगळ्यांना ही आनंदाची बातमी दिली. सगळ्या मित्रांनी पार्टी मागितली, त्याने 'लवकरच पार्टी देण्याचं' कबुलही केलं.

लंच टाइम संपला, 'तो' पुन्हा एकदा कामात व्यस्त झाला, लवकरात लवकर काम संपवून घरी जायचं होतं त्याला, मनाने तर तो कधीच घरी जाऊन पोचला होता.

पण त्याने त्यादिवशी घरी पोचावं हे निसर्गाच्या मनात नव्हतं. निसर्ग गडगडत हसू लागला, निसर्गाचं ते हास्य चित्रपटातल्या खलनायकांपेक्षा जास्त भीतीदायक होतं. थोड्यावेळाने वारा सुटला, पाऊस कोसळायला सुरुवात झाली. पाऊस वाढत गेला, साहजिकच मुंबईत ठिकठिकाणी पाणी तुंबायला सुरुवात झाली. दोन तासांनी रेल्वे वाहतूक ठप्प झाली, रस्ते वाहतुकीवर आधीच परिणाम झाला होता. प्रथेप्रमाणे मुंबईकरांना जिथे असतील तिथेच सुखरूप जागी थांबण्याचं आवाहनही करून झालं. काही तासात होत्याचं नव्हतं होण्याची भीती निर्माण झाली होती, पण ऑफिसमध्ये काम लवकरात लवकर उरकण्याच्या नादात ह्याचं लक्षच नव्हतं पावसाकडे.

त्याने सगळं काम उरकलं, लवकर जाण्याची परवानगी घ्यायला म्हणून बॉसकडे जाताना त्याचं लक्ष पॅसेजमधल्या खिडकीतून ढगांकडे गेलं, नव्हे ढगांनीच गडगडाटी हसत त्याला खुणावलं होतं. त्याच्या काळजात अचानक धस्स झालं,पण तरीही मुलीला भेटायला आतुर झालेल्या त्याने बॉसच्या केबिनचा दरवाजा वाजवला.

बॉसने युट्युबच्या लाईव्ह चॅनेलवर बातम्या लावल्या होत्या, "लवकर जाणं सोडाच, पण आज काहीही झालं तरी माझ्यासकट आपल्या स्टाफमधलं कोणीच घरी जाणार नाही, मी रिस्क घेऊ शकत नाही, आय ऍम सॉरी !" इतकं फर्म आणि कॉन्फिडन्ट उत्तर ऐकल्यावर नाईलाजाने त्याला थांबावं लागलं.


  1. "बाबा, तुम्ही आज धावत येण्याची काहीच गरज नाहीय. ऑफिसमध्येच थांबा, आपण उद्या सेलिब्रेट करू" असं मुलीने स्वतः कॉल करून सांगितल्यावर मुलीच्या समंजसपणाचं कौतुक वाटलं त्याला.


सगळ्या कलीग्जनि ती रात्र पत्ते, भेंड्या, दमशराज, अशी मस्त मजेत काढली, पण तरीही आपल्या मनातली भीती, काळजी  कोणीच लपवू शकत नव्हतं. पण ह्याचं लक्ष मात्र सारखं मोबाईलवरच्या मुलीच्या फोटोकडे जात होतं.

एकदाची पहाट झाली, पाऊस एव्हाना ओसरला होता, वाहतूक नुकतीच पूर्ववत होऊ लागली होती, हा धावत धावत निघाला. घरी पोचला कधी आणि कसा हे त्याचं त्यालाच कळलं नाही. पण त्याने डोअरबेल वाजवली, दरवाजा मुलीनेच उघडला. एरवी उशिरापर्यंत झोपून राहते म्हणून आईचा ओरडा खाणाऱ्या ह्या बाबाच्या लाडक्या लेकीला बाबाची चाहूल लागल्याने ती रोजच्यापेक्षा कितीतरी लवकर जागी झाली होती.

तिचा बाबा दोन पाऊलं आतमध्ये आला, आणि त्याने आपल्या लेकीला छातीशी कवटाळलं, कारण तो एक बाप होता

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा