सोमवार, ४ जुलै, २०१६

सहवास

नुकताच श्रावण सुरु झाला होता. नेहमीप्रमाणेच ऊन-सावलीचा लपंडाव सुरु झाला होता. ‘सहवास’मध्येही सर्वत्र हिरवळ पसरली होती. काही रहिवाश्यांनी हौसेने लावलेल्या आणि जोपासलेल्या विविध फुलझाडांना टपोरी फुले आली होती. थोडक्यात ‘सहवास वृद्धाश्रम’चा परिसर नैसर्गिक सौंदर्याने सजला होता.


अशातच ‘सहवास’मध्ये नव्याने आलेली ‘ती’ दोघं बागेतल्या लाकडी बेंचवर बसली होती. दोघंही दोन दिवसांपूर्वीच स्वेच्छेने नोंदणी करून राहायला आली असली तरीही दोघांनीही नावं वेगवेगळी सांगितली होती. त्यामुळे दोघंही एकमेकांना ओळखत असण्याची शक्यता तशी अस्पष्ट होती. म्हणूनच इतर जण नवीन आल्यावर त्यांना एकटं वाटू नये यासाठी जे जे केलं जातं ते ते ह्या दोघांसाठी करताना मला ‘सहवास’चा संचालक म्हणून नेहमीप्रमाणेच एक समाधान मिळत होतं आणि ती प्रोसिजर संपल्यावर आज दोघंही शांतपणे बसले होते.


वसंत लेले म्हणजे तसे वयाने पंच्याहत्तरीच्या एक-दोन वर्षं मागे-पुढे, वयोमानाने डोक्यावर मध्यभागी ‘चांदणे’ पडलेलं आणि आजूबाजूला चांदी पिकलेली, सकाळीच दाढी केलेला गोरागोमटा वर्ण, घारे डोळे, डोळ्यांना सोनेरी कडांचा गोल फ्रेमचा चष्मा असे गृहस्थ जांभळा टी-शर्ट, निळी जीन्स घालून बसले होते. तर अंगभर नेसलेली पांढरीशुभ्र साडी, अंगातला क्रीमिश रंगाचा ऑफ-व्हाईट अर्ध्या हाताचा ब्लाउज, डोक्यावरच्या चांदीने मढलेल्या केसांवर मोगर्याचा गजरा, गोल काळ्या फ्रेमचा चष्मा अशा वर्षा दामले वसंतरावांना सोबत करत होत्या. गेल्या दोन दिवसांमधल्या भेटींमध्ये दोघांच्याही चेहऱ्यावरच्या थोड्याफार सुरकुत्यांतूनही स्पष्ट जाणवणारे पूर्णत्वाचं समाधान दिसत होतेच पण त्याचबरोबर एकप्रकारची हुरुहूर सुद्धा स्पष्ट जाणवत होती आणि म्हणूनच मला नेमकं कळत नव्हतं कि त्यांच्या मनात नेमके काय चालले आहे. एकमेकांना अनोळखी असल्यामुळे त्यांना एकमेकांशी बोलायला तसं थोडं अवघडल्यासारखं वाटत होतं.  .  

          ह्यांच्या वागण्यातलं अवघडलेपण कसं दूर करता येईल ह्याचा विचार मी माझ्या खुर्चीवर बसून, समोरच्या खिडकीतून त्यांना पाठमोरं न्याहाळत करत होतो.


तेवढ्यात वसंतराव बोलू लागले, “तुम्हालाही मोगर्याचा गजरा फार आवडतो वाटतं ?”“तुम्हालाही म्हणजे ? जगातल्या प्रत्येक स्त्रीला मोगर्याचा गजरा आवडत असणार” अशा वर्षाताईंच्या उत्तराने विषय तिथेच संपला म्हणजे हि काही योग्य सुरुवात नव्हे हे वसंतरावांच्या लक्षात आले. पुन्हा थोडा वेळ शांतता पसरली. 

तेवढ्यात रूम नंबर १२ मध्ये राहणाऱ्या ओकांनी हट्टाने मागून घेतलेल्या त्यांच्या पर्सनल व्हीसीआर प्लेयर वर मोठ्या आवाजात शास्त्रीय संगीत लावलं, तसं जयामावशींनी पटकन १२ नंबरकडे धाव घेतली. त्याचं काय असतं कि मॅनेजर वगैरे पोस्ट्सवर काम करून निवृत्त झाल्यावर काहीजणांना सगळ्यांना हाताखाली वागवून घेण्याची सवय लागलेली असते, ओक हे तशाच वृद्ध सभासदांमधले, त्यामुळे सतत कोणालातरी त्यांच्याकडे लक्ष ठेवावं लागे. असो! हा सगळा गोंधळ मिटल्यावर असं लक्षात आलं कि वसंतरावांना वर्षातैंशी बोलण्यासाठी विषय मिळाला होता.

संगीत, नाटक, चित्रपट, चित्रकला वगैरे वगैरे विषय घेत गाडी एकदाची वैयक्तिक आयुष्याकडे गेली.


वसंतरावांचा संसार फार सुखाचा झाला होता. ते स्वतः नॅशनलाइज बँकेमध्ये ब्रांच मॅनेजर म्हणून रिटायर झाले होते, मुलगा सॉफ्टवेयर इंजिनियर होऊन युएसएमध्ये कायमचा सेटल झाला होता. अर्धांगिनी दोन वर्षांपूर्वीच ह्या जगातून इहलोकात गेली होती. आधी दिवसभर बँकेतलं काम, त्यानंतर ब्रेन हॅमरेज झालेल्या पत्नीची शुश्रुषा यांमुळे आता एकट्याला घर खायला उठतं म्हणून ते ‘सहवास’ शोधत सहवासपर्यंत आले होते.


वर्षाताईंचा सुद्धा संसार तसा सुखाचाच झाला होता.  ‘विद्याप्रबोधिनी’ मध्ये हेडमास्तरीण म्हणून कामगिरी सांभाळून त्या रिटायर झाल्या होत्या. नवरा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमधून रिटायर झाला होता. मुलीचं लग्न होऊन ती कॅनडाला शिफ्ट झाली होती. चार वर्षे अर्धांगवायुने झपाटल्यावर   दोन महिन्यांपूर्वीच वर्षाताईंच्या अर्धांगाची सुटका झाली होती. आधी शाळा, क्लासेस यांमध्ये जाणारा संपूर्ण दिवस; त्यानंतर नवर्यासाठी एक केलेलं दिवस-रात्रीचं चक्र, यांमुळे आता घरात एकटं राहवत नव्हतं, म्हणूनच ‘सहवासा’च्या अपेक्षेनं ‘सहवास’ची पायरी चढल्या होत्या.


हे सारं खरंतर त्यांनी फॉर्ममध्ये सुद्धा लिहिलं होतं आणि म्हणूनच माझ्यासाठी किंवा सहवाससाठी हे जाणून घेणं महत्वाचं नव्हतं, पण आमच्यासाठी हे नक्कीच महत्त्वाचं होतं कि निवांत अशा पहिल्याच भेटीत दोघंही आपल्या मनात कुठलाही किंतु न ठेवता व्यक्त होत होती. मुळात सहवासमध्ये स्वेच्छेनं येताना इथं कुणीतरी आपल्याला सांभाळेल, आपली कुणीतरी काळजी घेईल याबरोबरच इथं आपल्याला कोणीतरी असं समवयस्क भेटेल ज्याच्याशी आपलं मन आपण मोकळं करू शकतो असाही एक हेतू असायचा. त्याच हेतूतून आमच्याइथल्या नागरिकांचे, म्हणजे वयोवृद्ध अनाधार लोकांचे ज्यांना आम्ही ‘सहवासचे नागरिक’ असं म्हणायचो, पुरुषगट आणि स्त्रीगट असे दोन गट पडले होते, त्या गटांमध्येही अंतर्गत गट असायचे; ह्या सार्या गटांमध्ये धुसफूस, चिडचिड स्पर्धा आहे हे आमच्या म्हणजे संचालक मंडळाच्या लक्षात आलं होतं आणि कदाचित त्याचाच जालीम उपाय आम्हाला वसंतराव आणि वर्षाताईंच्या रुपात सापडला होता.


हळूहळू दररोज त्या बाकड्यावर वसंतराव आणि वर्षाताई येऊ लागल्या, त्यांच्यातली मैत्री दृढ होत गेली. ते कधी एकत्र गाणी ऐकायचे, कधी गायचे, कधीकधी वसंतराव एखाद्या नाटकातले संवाद म्हणून दाखवायचे. कधी नाटकाला तर कधी फिरायला जायचे. जेवायच्या वेळीही दोघे एकत्रच दिसायचे. कधीतरी एकमेकांना तेचतेच विनोद सांगून हसवायचे, कधीकधी नुसतंच शांत राहायचे, तर कधी एकमेकांचा आधार घेऊन रडायचे सुद्धा. असेच दिवस जात होते. मुळात आता एकमेकांच्या अनेक गोष्टी त्यांना शब्दांशिवाय कळू लागल्या. आम्हाला वाटायचं कि हे पुन्हा एकदा प्रेमात पडलेत, पण दोघांच्याही आधीच्या जोडीदारासोबतच्या आठवणी इतक्या घट्ट होत्या कि त्यांनी स्वतः प्रयत्न केला असता तरीही ते त्या पुसू शकले नसते. पण तरीही त्यांच्यात मैत्रीपलीकडचे एक अनामिक नाते निर्माण होत होते.


ह्या सार्याचा केवळ ‘सहवास’चा संचालक म्हणूनच नव्हे तर प्रत्यक्षदर्शी म्हणूनही साक्षीदार होतो. कारण माझ्या केबिनला असलेली खिडकी आणि त्या दोघांचा ठरलेला बेंच ह्यात फक्त एका ८ फुटाच्या कॉरिडोरचं अंतर होतं. आणि पूर्वी मुद्दामच मी त्या खिडकीच्या समोरच माझं टेबल सेट केलं होतं जेणेकरून बाहेर लक्षहि ठेवता यायचं त्याचाच फायदा आज होत होता. एक अनामिक नातं रुजत असताना त्याची प्रक्रिया मी जवळून पाहिली होती.      

एक दिवस वसंतराव आणि वर्षाताई दोघंही माझ्या केबिनमध्ये आले.

“ या, या बसा... काय वसंतराव ? केबिनमध्ये कशाला आलात, चंदूबरोबर निरोप पाठवायचा, लगेच आलो असतो कि तुमच्या रूममध्ये. ”

“ थोडं वैयक्तिक बोलायचं होतं आणि ते माझे रूम पार्टनर देशपांडे, त्यांच्या तोंडात तिळहि भिजत नाही. तुम्हाला कळणं महत्वाचं होतंच पण त्याचबरोबर त्यांनासुद्धा कळायला नको असं काहीसं असल्यामुळेच आम्ही दोघंही स्वतः आलो.”

“म्हणजे नेमकं काय ..?” आधीच थोडासा अंदाज असला तरीही वसंतरावांनी इतकं प्रायव्हेट काहीतरी सांगायचंय असं भासवल्याने मीही बुचकळ्यात पडलो. मुळात ह्यांच्या अशा नेहमीच सोबत असण्याने ‘सहवास’मध्ये कुजबुज सुरु झाली होतीच. पण आम्ही ती जाणीवपूर्वक दोघांपासून दूर ठेवण्यात यशस्वी झालो होतो.


“आम्ही दोघंही ‘सहवास’ मध्ये आलो तेच मुळात कुणाचाच सहवास नसल्याने, सहवासाच्या ओढीने !
आलो ते नेमकं योगायोगाने एकाच वेळी, दोघंही एकदम आलो म्हणून थोडीशी उत्सुकता होतीच एकमेकांविषयी. हळूहळू एकमेकांची ओळख वाढत गेली, मैत्री होत गेली, एकमेकांचा स्वभाव एकमेकांना कळत गेला आणि लक्षात आलं कि माझ्या ‘वर्षा’मध्ये आणि ह्या वर्षामध्ये फक्त नामसाधर्म्यच नव्हे तर दोघांचे स्वभावहि फार मिळते-जुळते आहेत. दोघींनीही एकदा एखाद्याला आपलंसं केलं कि त्याने तोडेपर्यंत दोघींचही आयुष्य त्याच्याभोवतीच गुरफटून राहणार ...”

“ अगदी वसंताच्या बाबतीतहि हेच म्हणता येईल. माझे ‘शरद’ सुद्धा असेच परखड, निःपक्षपाती, निर्भीड, स्वाभिमानी होते.” आत्तापर्यंत शांत असलेल्या वर्षाताई बोलल्या.

“ तेव्हा आम्ही तुम्हाला विनंती करतो, प्लीज आम्हा दोघांनाही एका रूममध्ये राहायला मिळावं. मुळात माझ्या स्पष्टवक्तेपणाने इतर पुरुष  सभासद माझ्या सोबत राहायला तयार नाहीत. आणि त्याचजोडीला मला संसाराचा गाडा ओढताना ‘माझ्या वर्षा’सोबत करायच्या राहिलेल्या गोष्टी पूर्ण करता येतील. ” वसंतराव घडाघडा नेहमीप्रमाणेच मनातलं सारं स्पष्टपणे बोलून गेले आणि नंतर वर्षाताईंकडे पाहू लागले.

“ मुळात मला संस्थेच्या नियमांप्रमाणे असं करता येणार नाही, पण त्याचबरोबर एक पर्यायसुद्धा सांगतो, तुमच्या दोघांच्या फॅमीलीजना काहीही हरकत नसेल तर तुम्ही दोघांपैकी एकाच्या मूळ घरी एकमेकांसोबत राहू शकता” खरंतर मलाच ‘नाही’ म्हणताना वाईट वाटत होतं पण पर्याय ऐकल्यावर दोघांच्याहि चेहऱ्यावर हसू  फुललं. कारण वसंतरावांच्या मुलाला भारतात यायचंच नव्हतं त्यामुळे त्यांच्याघरी दोघंही राहू शकत होते.

त्या संध्याकाळी वसंतराव वर्षाताईंसाठी मोगर्याचा गजरा घेऊन आले होते, वर्षाताईंनी वसंतरावांकडून तो हौसेनं माळून घेतला आणि त्यानंतरमात्र दोघेही अश्रूंमध्ये चिंब भिजले.

दुसर्या दिवशी सकाळीच दोघेही ‘निरोप’ घ्यायला केबिनमध्ये आले. दोघांच्याही चेहऱ्यावर पूर्वीप्रमाणे पुर्णत्वाचं समाधान होतंच, पण आता ‘ती’ पूर्वीची हुरहूर जाऊन एक गोड हास्य उमललं होतं. त्या दोघांनी जणू ‘सेकंड इनिंग’ला सुरुवात केली होती.    
     .                                                                                                                                       

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा