मी असा घडलो 
मुळात आमचे आई-बाबा पहिल्यापासूनच हौशी.
त्यामुळे असे बरेच किस्से आहेत. त्यातले काही किस्से : 
- किस्सा प्रकार :- गावातल्या नाटकाचे किस्से
 
मु.पो.चवे-देऊड हे ता.जि.रत्नागिरीतले,
गणपतीपुळ्यापासून १४किमीवर असणारे आमचे मूळ गाव. साधारण ३०० वर्षांपूर्वी आमच्या
पूर्वजांपैकी एकाला गावच्या नदीत अंघोळ करताना स्वयंभू गणेशमूर्ती सापडली, त्या
मूर्तीसाठी देऊळ बांधले. दर माघी गणेशजयंतीला उत्सव होतो. उत्सवप्रेमी कोकणी
माणसाचे दुसरे वेड म्हणजे उत्सवातील नाटक ! आमच्याकडेही २००५पर्यंत आम्ही(आई-वडील
आणि त्या पिढीतील देऊडकर) स्वतः नाटक बसवायचे त्या नाटकातले हे दोन प्रसंग..पहिला प्रसंग जेव्हा घडला तेव्हा अस्मादिक
४वर्षांचे होते. त्यावेळी अत्र्यांचे ‘कवडीचुंबक’ नावाचे नाटक ठरले होते.
नाटकातल्या नायकाला एक वैशिष्ट्यपूर्ण पगडी पोशाखात दिली गेली होती. ती
अस्मादिकांनी रंगीत तालमीच्या वेळी पाहिली कारण आई-बाबा दोघेही नाटकात असल्याने
आम्हाला तालीम बघण्याचा अलिखित अधिकार होता. नाटकाची वेळ जवळ आली होती. भूमिका
असलेल्या माणसांच्या तोंडाची रंगरंगोटी चालू होती. अस्मादिकांना प्रेक्षकांमध्ये
बसलेल्या मामाकडे सोपविले होते. आणि मला काय वाटले काय ठावूक ? पण ‘पंपुशेठ’
नावाच्या नायकाची ‘ती’ पगडी घालून उघड्या रंगमंचावर फिरण्याचा हट्ट मी धरला. मी
कोणाचही ऐकेना म्हणून शेवटी अर्ध्या मेकअपवर बाबा विंगेतून पटकन माझ्याकडे आले आणि
मला घेऊन परत विंगेत गेले, तेही मला शांत करण्याच्या प्रयत्नात. पण मी त्यांचंही
ऐकेना म्हणून शेवटी पंपुशेठचं काम करणाऱ्या माणसाबरोबर नांदीपूर्वी पडदा उघडून मला
‘ती’ पगडी घालून एक फेरी मारायला दिली गेलीदुसरा किस्सा मी चौथीत असतानाचा. बाबाच
दिग्दर्शक. मला त्यावर्षीच्या नाटकात काम करायचे होते, पण ‘पद्मश्री धुंडिराज’
ह्या पुरुषपात्र-विरहीत   नाटकात
माझ्यासाठी एकही भूमिका नव्हती. मग शेवटी रागावून सगळ्यांशी अबोला धरला तेव्हा मूळ
संहितेत नसलेली भूमिका निर्माण करून बाबांनी मला नाटकात घेतले. पण नाटकाच्या वेळी
प्रेक्षकांमध्ये आपलीच माणसं बसलेली बघून कुरुक्षेत्रावर युद्धापूर्वी अर्जुन जसा
गलितगात्र झाला होता हे अनुभवले. मी खरंतर पळून समोर प्रेक्षकांमध्ये उडी घेणार
होतो, पण नाटकातल्या आईने म्हणजे मोठ्या काकूने हात घट्ट धरून ठेवला आणि माझी सगळी
वाक्य कापून फक्त माझी उपस्थिती ठेवून नाटक यशस्वीपणे पार पाडले गेले.
-  किस्सा प्रकार दुसरा : शाळेतल्या
स्नेहासंमेलातले किस्से
 
ह्यात अगदी नाटक लिहिण्यापासून सारी मदत
आई-बाबांनी केलेली आहे. कधी जुन्या एक्सरेपासून मुकुट कर, तर कधी त्यावर कापूस
लावून दाढी-मिश्या तयार कर; कधी इलेक्ट्रिक केसिंगपट्टी पासून तलवार कर, तर कधी
मोरपिसे आणून मला मोर कर असे अनेक प्रकार, अनेक वेशभूषा कधी घरातील टाकाऊ पासून
तयार करून तर कधी लोकांकडून मागून आणून मला स्नेहसंमेलनासाठी तयार करणे हि मुख्य
जवाबदारी आई-बाबानी शाळेची १०वर्षे पार पाडली. सहावीत असताना सरांनी मला “नाटक
लिहिणार का ?” विचारलं, खरंतर ह्याआधी असं काहीच केलं नसताना मी ‘हो’ म्हटलं.
खरंतर धड्याचेच नाट्यरूपांतरण करायचे होते; पण मला जमेना. तेव्हा आईने स्वतः लिहून
दिले आणि शाबासकी मला मिळाली.ज्यावेळी इतर सार्याच सहभागी विद्यार्थ्यांचे
पालक प्रेक्षकांमध्ये बसलेले असायचे तेव्हा अनेकदा माझे आई/बाबा वरती माझी आणि इतर
मुलांची तयारी करून देत असायचे. हीच गोष्ट शाळेतल्या फँन्सी ड्रेस, वारी अशा अनेक
वेळी झाली. आई-बाबा होते म्हणून अनेक ठिकाणी बक्षिसे मिळवली, आई-बाबा होते म्हणून
अनेक ठिकाणचे अपयश पचवू शकलो.
- किस्सा प्रकार तिसरा : ‘मनाचे श्लोक’ पाठांतर
स्पर्धा
 
तिसरीत इतरांपेक्षा कमी पाठ झाले म्हणून
वगळण्यात आल्यानंतर आईने ४थीला माझ्यावर जीवापाड मेहनत घेतली आणि इतरांपेक्षा अचूक
म्हणू लागलो. पण इतरांपेक्षा अचूक म्हणतो आणि टीमचे कोऑडिनेशन होत नाही म्हणून
वगळण्यात आले. तेव्हा त्यासाठी आईने शाळेत जाऊन राडा घातला होता, त्यावेळची ‘ती’
रणचंडिका माता काही झाले तरीही विसरू शकत नाही.
- किस्सा प्रकार चौथा : कॉलेजमधला पहिल्या आयएनटी
चा किस्सा (पुणेकरांसाठी : आय.एन.टी. हि पुरुषोत्तम प्रमाणेच एक दिग्गज एकांकिका
स्पर्धा असते)
 
माझी आय.एन.टी. ची पहिलीच वेळ. जत्रेचा सीन
होता. फुगेवाल्याची भूमिका मला दिली गेली होती. मध्ये ‘स्टॅच्यु पोजिशन’ आणि ‘स्लो
मोशन’ होते. मी ‘स्टॅच्यु पोजिशन’मध्ये न थांबता स्लो मोशन मध्ये लाईटलाईनच्या
म्हणजे जिथे रंगमंचावरचा लाईट पडत नाही त्या भागात जाऊन पुन्हा तसच फिरून झिरो
विंगेतून आत न जाता सेकंड लेफ्ट विंगेतून आत गेलो.
- असे अनेक किस्से, अनेकांचे हातभार, अनेकांचे
सांभाळून घेणे, अनेकांनी ‘शाळा’ घेणे ह्यामुळे रंगमंचावर सरावलो आहे, आणि कधीच न
जाणारे नाट्यवेड घेऊन प्रवास करत आहे.                  
 
                                                                                
 
 
 
 
 
          
      
 
  
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा