सोमवार, ४ जुलै, २०१६

काल्पनिक प्रवासवर्णन



मी ना धड आस्तिक-ना धड नास्तिक होतो तेव्हा नर्मदामैय्याने माझ्या आयुष्यात घडवलेल्या परिवर्तनाची हि कथा !!

हि गोष्ट आहे ती मी बारावी झाल्यानंतरची, वयाचं १६वं वर्षं ओलांडून १७व्या वर्षात पाऊल ठेवलं होतं. त्यामुळे अंगात तारुण्याचं सळसळतं वारं भरलं होतं. जगाच्या विरोधात जाऊन जग जिंकण्याची खुमखुमी चढली होती. मुळातच बाबांचं लग्न उशिरा झालं होतं आणि त्यातही लग्नानंतर गर्भार होण्यासाठी आईला अधिक कालावधी लागला होता, त्यामुळे बाबांमध्ये आणि माझ्यामध्ये जनरेशन गॅपची भिंत उभी राहिलेली. आणि त्यात लागलेली संगत, परिणामी व्यसनांच्या आहारी गेलो होतो, त्यामुळे घरी रोजच भांडणं व्हायची. त्यात बारावीत आकर्षणाला प्रेम समजून वाहवत गेलो. या सार्याचा परिणाम बारावीच्या निकालात दिसलेला.  आता करायचं काय ? घरी कसं जायचं ? बाप मारेल काय ? घरातून बाहेर काढेल काय ? नुसतं थैमान घातलं होतं विचारांनी. अनेकदा डोक्यात आत्महत्येचे विचारही येऊन गेले होते. रात्री ७ वाजेपर्यंत मी कॉलेजमध्येच बसून होतो.  

त्यात एका मित्राने सुचवलं, “अरे एवढं कसलं टेन्शन घेतोस ? सरळ २-४ दिवस घरातून गायब हो, घरचे इमोशनली फुल बनतील आणि काहीही बोलणार नाहीत.”


घरी जायचं कुठे वगैरे विचार करायला वेळच नव्हता. तसाच गेलो दादर स्टेशनला; अहमदाबादच्या मित्राकडे जायचं असं ठरवून चढलो तो नेमका पंजाब मेल मध्ये a/c बोगीत. 


खरंतर तिकीट वगैरे काहीच नव्हतं.

तेवढ्यात एक धिप्पाड, जाडजूड, काळ्या वर्णाचा आजोबांच्या वयाचा माणूस माझाकडे आला आणि मला म्हणाला, “बेटा कहाँ जा रहे हो ?”


“अ...अं..” त्याला बघुनच एवढा घाबरलो होतो की अहमदाबाद हे नावच तोंडून निघेना.


“अच्छा, तो तुमभी ओंकारेश्वर जा रहे हो, तो चलो फिर साथ चलते हैं; तेरा सिट नंबर क्या है बेटा ?”

मी विचार केला की नाहीतरी फक्त घरापासून २-४ दिवस दूर राहण्यासाठी जायचय मग अहमदाबाद असो किंवा ओंकारेश्वर मला काय फरक पडतो ?  


“अंकल मेरेपास तो टिकट ही नही है” इति मी ! 


“चलो कोई दिक्कत नहीं. यह तो अच्छा ही है, क्यूंकि मेरे पास एक जादा है”


टीसी आला, त्या बाबाने तिकिट दाखवल, टीसी निघून गेला.


रात्रि म्हातारबाबाने आणलेला कुसली नावाचा करंजीसारखा दिसणारा फार चविष्ट आणि गोड पदार्थ खाल्ला, जणू काही हा मला गोड आवडतं म्हणूनच घेऊन आला होता.   ते खाऊन झोपलो ते म्हातारबाबाने पहाटे ४.३० ला उठवलं, “बेटा, जाग जाओ, अभी खांडवा मे उतरना पडेगा. तभी तो ओंकारेश्वर जा पाओगे”


या त्याच्या शेवटच्या शब्दांत इतका विश्वास होता कि मलाच एक सेकंद वाटलं कि मी खरच ओंकारेश्वरला जाण्यासाठी आलो होतो. 


खांडवा स्टेशनला उतरलो आणि म्हातारबाबाने सांगितलं “बेटा हमे अभी बससे ओंकारेश्वर जाना है”
मग जवळ-जवळ १.३० तासात आम्ही ओंकारेश्वरला पोहोचलो होतो, बसमधून उतरताना माझ्यासोबतच उतरलेला म्हातारबाबा “मै जल्दहि आता हूँ” असं म्हणत कुठे गायब झाला ते कळलच नाही.


पण आता सोबतीला हजारो लोक होते, आणि तेही माझ्यासारखेच रस्ता चुकून आले असावेत असं वाटत होतं.मग मीहि एक अनुभव म्हणून त्यांच्याबरोबर ओंकारेश्वराच्या मंदिरात गेलो आणि काय आश्चर्य, शिवलिंगाच्या जागेवर कालचा म्हातारबाबाच ध्यान लावून बसला होता. आणि मग मी नर्मदामैय्याच्या भेटीसाठी गेलो. 

तिथे गेल्यावर मनातली सगळी खळबळ क्षणार्धात कुठल्याकुठे पळून गेली, मी इथे का आणि कसा आलोय हेही विसरून गेलो. 


 खरंतर घरी परतण्याची इच्छा नव्हतीच पण ४ दिवसांनी ‘तो’ म्हातारबाबा स्वप्नात आला, “बेटा, अब घर जाओ, माँजी-बाबूजी फ़िक्र कर रहे है पर हमे भुलना नही

मग परतलो तर काय आश्चर्य ! माझ्या घरी बोर्डाकडून फोन आला होता कि माझी marksheet चुकली होती.               

जणू काही नर्मदामैय्याच मला बोलावीत होती आणि मला घेऊन येण्यासाठीच त्या बाबाला तिने मुंबईला पाठवलं होतं, असं वाटू लागलं. 

मग कधी भरकटलो नाही, भरकटलो तरीही म्हातारबाबा स्वप्नात येतो आणि सांगतो “बेटा माँ बुला रही है” अणि मग मी परत तितक्याच ओढीने नर्मदा मैय्याकडे धाव घेतो.                                                                                        

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा