जातिधर्म आणि बदलता समाज 
मुळात जगातील कुठलीही गोष्ट, संस्था, अथवा व्यवस्था हि कालानुरूप बदलत गेली. आज समाजात जातीपातींचे उच्चाटन होण्यासाठी सुरुवात झाली आहे आणि हे निश्चितच भारतीय समाजाची पाऊले शाश्वत विकासाच्या दृष्टीने पडत असल्याचे लक्षण आहे. 
पण कुठल्याही गोष्टीला विरोध करत असताना ती गोष्ट आधी मुळापासून समजून घ्यावी लागते. आणि जातीधर्माबद्दल विरोध व्यक्त करताना अनेक सुज्ञ दुर्दैवाने ह्या व्यवस्था मुळापासून समजून घेताना दिसत नाहीत. 
तर ह्या पोस्ट मध्ये जाती-धर्मांचा थोडासा इतिहास सांगावा लागेल असं दिसतंय. 
जाती-धर्माचा इतिहास सांगायचा झाला तर आदिम काळापासून, अगदी अश्मयुगापासून सुरुवात करावी लागेल.त्याकाळी प्रत्येक टोळीचा स्वतःचा धर्म, स्वतःची जात, स्वतःची दैवते आणि स्वतःची प्रतीके होती. 
त्यानंतर आगीचा आणि शेतीचा शोध लागला. मग ह्या टोळ्या त्या त्या प्रदेशात कायमच्या स्थिर झाल्या. ह्यातून समाजव्यवस्थेचा उदय झाला.  आता ह्या समाजात राहणाऱ्या माणसांवर काही जवाबदार्या आल्या. उदा. आपल्या प्रतीकांचा सांभाळ करणे, आपल्या समाजाचे इतर समाजाच्या आक्रमणापासून संरक्षण करणे, आणि माणसांच्या दैनंदिन व्यवहारातील गरजा पूर्ण करण्याची जवाबदारी अशा अनेक. 
पुढे त्यातून वर्णव्यवस्था उदयास आली. हि वर्णव्यवस्था आणि आत्ताच्या जातीपाती ह्या समानच आहेत असे म्हणणार्यांना वास्तव माहित नसते, किंवा ते वास्तवाकडे कानाडोळा करतात. कारण ह्या दोन व्यवस्थांमध्ये सगळ्यात मोठ्ठा फरक आहे तो पारंपारिक व्यवसायपद्धतीचा ! वर्णव्यवस्थेमध्ये पारंपारिक व्यवसायपद्धती नव्हती तर प्रचलित जातीव्यवस्था हि मुळातच पारंपारिक व्यवसायपद्धतीच्या पायावर उभी आहे. 
पुढे बारा बलुतेदार पद्धती आली आणि तिनेच सगळ्यात मोठा गोंधळ घातला. आत्ता आपण ज्या व्यवस्थेला जातीव्यवस्था म्हणतो, ती खरतर बारा बलुतेदार पद्धतीच आहे. ह्या बारा बलुतेदार पद्धतीमुळे पारंपारिक व्यवसायपद्धती उदयास आली. मग आधीच धर्मांच्या आधारावर विभाजन झालेल्या समाजाचे पुन्हा एकदा (बलुतेदारी पद्धतीतील) जातींच्या आधारावर विभाजन झाले. आणि त्यातून आत्ताच्या जाती-पातीतील भेदाभेद तसेच इतर समस्यांनी डोके वर काढले. 
शिवरायांच्या काळातच खरतर बारा बलुतेदार पद्धतीला हादरे बसायला लागले होते. अठरा पगड जातीचे लोक महाराजांच्या मावळ्यांमध्ये समाविष्ट होते. पुढे तर बाळाजी विश्वनाथ भट आणि त्यांचे वंशज मराठा साम्राज्याचे पेशवे झाले. १९४७ च्या स्वातंत्र्यानंतर आपण भारतीयांनी बारा बलुतेदार पद्धतीला तिलांजली दिलीय. आज प्रत्येकाला आवडीच्या क्षेत्रात काम करण्याचे आणि स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याचे  संपूर्ण स्वातंत्र्य आहे. पण तरीही आपण बारा बलुतेदार पद्धतीची पाळेमुळे आपल्या समाजातून पूर्णतः उखडू शकलो नाही हे आपलं  दुर्दैव आणि अपयश म्हणावं लागेल.      
#ह्या_बारा_बलुतेदार_पद्धतीला_माझाही_विरोधच_आहे
पण  आता जातीव्यवस्थेमध्ये  अमुलाग्र बदल  घडून येणे  अनिवार्य  आहे.   
आपण आत्ता भारतीय म्हणून एकत्र राहतोय. ह्या भारतिय समाजात राहणाऱ्या प्रत्येकावर समाजघटक म्हणून काहीनकाही जवाबदारी आहे. 
त्यातूनच नव्या जातीव्यवस्थेचा उदय व्हायला हवा. पण ह्या जातीव्यवस्थेच्या जवाबदार्या असल्या तरीही त्या प्रत्येकाला अनिवार्य असू नयेत. प्रत्येकावर त्या पूर्ण करण्याचे बंधन लादले जाऊ नये. स्पृश्यास्पृश्यता आणि अमंगल भेदाभेद केला जाऊ नये.
पण नव्या जातिव्यवस्थेचा उदय म्हणजे नेमकं काय ? 
पूर्वी समाजाचे संरक्षण करणारी क्षत्रियजात होती. आज भारतीय सैन्य भारताच्या सीमांवर डोळ्यात तेल घालून आपले रक्षण करत आहेत. आता भारतीय सैन्याशिवाय आपण काही वेळापुरते तरी सुरक्षित राहू का ?    
भारतीय सैन्य हे नव्या जातीचे एक उदाहरण झालं. अशा अनेक जाती उदयास यायला हव्यात. ज्या केवळ व्यवसायापुरत्याच मर्यादित असाव्यात. जीवनाच्या इतर क्षेत्रांना लागू पडू नयेत. 
थोडक्यात  काय तर 'जगा आणि जगू द्या' ह्या पायावर ह्या नव्या जातिव्यवस्थेची उभारणी झाली पाहिजे.  
-  वैचारिक सर्वेश्वर
 
 
 
 
 
          
      
 
  
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा