शुक्रवार, २७ मे, २०१६

शिवरायांस पत्र (शिवजयंतीप्रीत्यर्थ)

प्रति,  आदरणीय शिवप्रभू,


आज साक्षात आपल्याला पत्र लिहून तसदी देतोय, याबद्दल क्षमस्व ! पण त्याचे काय आहे नं, तुम्ही आम्हांला जितके आदरणीय आहात, त्यापेक्षा जास्त पूजनीय, वंदनीय आणि प्रिय आहात. म्हणूनच हा पत्रव्यवहार करायची हिंमत करतोय. आपण आपल्या राज्यकारभारातून वेळ काढून हे पत्र वाचाल ह्याची आशा नव्हे, तर खात्रीच आहे. कारण तुमच्या राज्यात श्रीमंत-गरीब, उच्च-नीच, ब्राम्हण-क्षुद्र असे कुठलेही भेद नव्हते.          

 ‘स्वराज्या’तल्या प्रत्येकालाच ‘आपलंसं’ असतं ते स्व-राज्य आणि म्हणूनच म्हणावसं वाटतं कि आम्ही ब्रिटीशांपासून स्वतंत्र झालो असलो; तरीही अजून स्वराज्य आलेलं नाही. किंबहुना स्वराज्य असंच येत नाही, त्यासाठी मोठी खडतर परीक्षा द्यावी लागते ही शिकवणच आम्ही तुमच्याकडून घेतली नाही. आणि म्हणूनच खेदाने म्हणावं लागतं कि तुम्ही आम्हांला आदरणीय, पूजनीय आणि प्रिय असलात तरीही अनुकरणीय ठरला नाहीत.      

आज सर्वत्र महाराष्ट्रात तुमच्या नावांचा जयजयकार होतोय, अनेक शिवव्याख्याते तुमच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्रालाच तुमची नव्याने आणि खरोखर नवी ओळख देऊ बघतात. पण ह्या सार्या गाजवाज्यामध्ये मला ‘तुमचा महाराष्ट्र’ कुठेतरी हरवल्यासारखा वाटतो.      

 आज तुमच्या जयंतीबद्दल अक्क्खा महाराष्ट्र आनंद व्यक्त करत असताना, तुमच्या जयंतीनिमित्त सर्वत्र जल्लोषाचा पूर आलेला असताना मी खरच दुःखी आहे. आणि माझी खात्री आहे, आजच्या ह्या मराठा समाजाची  (म्हणजे मराठी समाजाची हं, नाही आज मराठा ही एक जात झालीय नं) झालेली दुरावस्था बघून तुम्हीही उद्विग्न झाला असाल, ह्यासाठीच मी आणि माझ्या ‘सिंहा’नी रक्त सांडलं का ? ह्यासाठीच जीवावर उदार होऊन मी आग्र्याहून सुटका करून घेतली का ? असे अनेक प्रश्न आपल्या मनात सतत येत असतील.   

ज्यावेळी आपण आजच्या ‘राजे परत या’ वगैरे ह्या असल्या आरोळ्या ऐकत असाल; तेव्हा आपल्याला आपला ‘हर हर महादेव’ हा मंत्र आठवल्याशिवाय राहत नसेल. पण आम्ही तरी काय करणार ? आम्हालाही वाटतं, आपल्यासारखा एखादा तरी नेता जन्माला यायला हवा पण तो दुसर्याच्या घरात, नव्हे तर दुसर्या राज्यात. म्हणूनच आम्ही आमच्याच राष्ट्राविरुद्ध आरोळ्या देणाऱ्या कन्हैय्यासाठी तुमच्या पुण्यात रॅली वगैरे काढतो.  

इतकेच कशाला ? आपण आम्हांला शिकवण दिलीत ती परस्त्रीला मातेसमान मानण्याची. पण आपल्याच जयन्तीसाठी काढलेल्या रॅलीमध्ये शेजारून जाणारी मुलगी दिसली कि आमच्या गाडीचा स्पीड मंदावतो आणि आम्ही तिच्या ‘फिगर’चा अंदाज काढू लागतो. आणि तुमच्या स्मरणासाठी लावलेल्या स्पीकरमध्ये आम्ही एखाद्या ‘मुन्नी’ला बदनाम करतो.

एखाद्या पुरुषाने एखाद्या स्त्रीशी बदअंमल केला, तर आपण त्या पुरुषाचा चौरंगा करत. पण आज आमची शाळकरी मुलं आपल्याच गडांवर जाऊन बदअंमल करतात. अगदीच ती मुलगी नाही म्हणाली तर अॅसिड किंवा सुराही चालवला जातो.   

तुम्ही प्रत्येक जातीतल्या लोकांचा विचार त्यांच्या भल्यासाठी केलात, आम्ही मात्र आमच्याच भल्यासाठी त्यांचा वपर करतो.तुम्ही हिंदू धर्म सांभाळण्यासाठी जीवावर उदार होऊन भगवा ध्वज हाती घेतलात, पण आम्ही मात्र तुमचा भगवा ध्वज हाती घेऊन जाती-धर्माचंच राजकारण करतो. नाहीतर तुमच्याच हिंदु धर्मावर शिंतोडे उडवून स्वतःला सुधारित, विकसित,’पुरोगामी’ म्हणवून घेतो.         

आपण राज्यव्यवहारकोश काढलात, तो मायबोली मराठीच्या प्रचारासाठी. पण आज मराठी भाषेचे राजकारण करून स्वतःचा प्रचार करणारे मात्र स्वतःच्याच मुलांना आंग्लमाध्यमातील शाळेत पाठवतात.

  तुम्ही ब्रिटिशांना सुद्धा आपले ‘होन’ आणि ‘शिवराई’ वापरायला लावलेत, आम्ही मात्र आमच्या स्वार्थासाठी कोट्यावधी भारतीय रुपये परदेशी बँकांकडे सुपूर्द करतो.

आपण आमच्यापुढे प्रत्येक गोष्टीतला एक ‘आदर्श’ ठेवलात, आम्ही मात्र सैनिकांसाठी राखीव जागांवर ‘आदर्श’ बांधण्याची स्वप्नं बघतो.

तुमच्या स्वप्नातला महाराष्ट्र घडविण्यासाठी झटण्यापेक्षा आम्ही तुमचं स्मारक बांधायला झटतो. आम्ही तुम्हांला, तुमच्या विचारांचे पालन करण्याची गुरुदक्षिणा द्यायला हवी. तर त्याउलट तुम्ही तुमच्या विचारांमध्ये जिवंत असतानासुद्धा तुमचे स्मारक बांधतो.  

खरंच, केवढे कृतघ्न करंटे निपजलोय आम्ही ? महाराज आपण खरंच आमचं हे पत्रं वाचाल का ?

तुम्हांला आपलं म्हणण्याचा अधिकार आम्हांला आहे का ? आपण खरंच आमचे राहिलायत का ?                    

 महाराज, क्षमस्व ! खरंच माफ करा.

फक्त एकच सांगतो, हे सारं बदलण्याचा प्रयत्न मी माझ्यापासून सुरु करीन. पण फक्त तुमचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असू देत. मला तुमचे विचार अंमलात आणण्याचे चातुर्य आणि शौर्य द्या.                                                                                                                                       -तुमचाच मावळा, श्रीसर्वेश्वर©


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा