मंगळवार, २९ ऑगस्ट, २०१७

'तो' एक बाप होता.

आज संध्याकाळी मध्य रेल्वेवर लोकल्स ठप्प झाल्याचं कळलं आणि आज दुपारी २.३०च्या दरम्यान अनेकदा भेटलेला 'तो' माणूस  आठवला. तसे  आम्ही आज दुपारी ३-४ तास एकत्रच होतो, पण 'त्या' काही क्षणांपुरता 'तो' माणूस कोणीतरी वेगळाच होता. नाही, तसा वेगळा म्हणजे कोणी 'सुपरहिरो' वगैरे नव्हे, तर तो 'त्या' क्षणांपुरता इतर काही नसून एक सर्वसामान्य 'बाप' होता. त्याचा म्हणजे खरंतर त्याच्यातल्या बापाचा हा  आजच्या दिवसाचा प्रवास !

तसा तो एक डोंबिवलीपल्याडचा सर्वसामान्य, मराठमोळा नोकरदारच होता, पण आजचा दिवस त्याच्या मधल्या 'बापा'चा होता. ह्याचं कारण म्हणजे त्याच्या लाडक्या आणि एकुलत्या एक मुलीचा आज १२वी चा रिझल्ट होता. सकाळी सकाळी नेहमीच्या वेळी घरातून निघताना त्याने झोपलेल्या तिला एकदा चिंतीत नजरेनं  पाहिलं आणि स्वतःशीच म्हणाला  "काही झालं तरीही हि नापास होणार नाही, आपल्या परिस्थितीमुळे आपण तिला एखाद्या मोठ्या क्लासला लावलेलं नसलं म्हणून काय झालं ???" एवढं पाठबळ सुद्धा तो तिला 'ती' जागी असताना देऊ शकला नव्हता. कारण नेमका कालच अतिकामामुळे त्याच्याकडे  उशिरा घरी उशिरा पोहचण्या शिवाय दुसरा उपाय नव्हता.

१० वाजल्यापासून ऑफिसमध्ये काम करत होता हे खरं, पण त्याचं लक्ष मधूनमधून सारखं घड्याळावर जात होतं. घड्याळात एक वाजायची तो जितक्या आतुरतेने वाट बघताना त्याला ओटीबाहेरचा तो आठवत होता.  एक म्हणजे खरंतर त्याचा लंच टाईम ! पण मित्र जेवणासाठी बोलवायला आले, तेव्हा त्यानं सांगितलं, "मुलीचा रिझल्ट बघितल्याशिवाय एकही घास माझ्या घश्याखाली उतरेल असं वाटतं तुला ?"

मित्राला असं सांगून तो रिझल्ट बघायला कम्प्युटर कडे वळला खरा पण साईट हँग होती, काहीच दिसत नव्हतं. बहुतेक हजारो लोक एकाचवेळी ऑनलाईन आल्याने झालं असावं असं समजवत तो प्रयत्न करत राहिला. पंधरावीस मिनिटं झाली असतील, तरीही सर्व्हर डाऊनच होता; तितक्यात त्याचा फोन वाजला.

मुलीचाच फोन होता, ७० % मिळाले होते, त्याच्या डोळ्यात तरळलेलं पाणी लपवायचा एक व्यर्थ प्रयत्न केला त्याने, पण त्याच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद ते अश्रू नसून सुखाश्रू होते ह्याची ग्वाही देत होता. फोन झाल्यावर तो इतक्या आनंदात ओरडला कि शेजारच्या कॅन्टीनमध्ये डबे खाणारे त्याचे मित्र धावून आले. त्याने सगळ्यांना ही आनंदाची बातमी दिली. सगळ्या मित्रांनी पार्टी मागितली, त्याने 'लवकरच पार्टी देण्याचं' कबुलही केलं.

लंच टाइम संपला, 'तो' पुन्हा एकदा कामात व्यस्त झाला, लवकरात लवकर काम संपवून घरी जायचं होतं त्याला, मनाने तर तो कधीच घरी जाऊन पोचला होता.

पण त्याने त्यादिवशी घरी पोचावं हे निसर्गाच्या मनात नव्हतं. निसर्ग गडगडत हसू लागला, निसर्गाचं ते हास्य चित्रपटातल्या खलनायकांपेक्षा जास्त भीतीदायक होतं. थोड्यावेळाने वारा सुटला, पाऊस कोसळायला सुरुवात झाली. पाऊस वाढत गेला, साहजिकच मुंबईत ठिकठिकाणी पाणी तुंबायला सुरुवात झाली. दोन तासांनी रेल्वे वाहतूक ठप्प झाली, रस्ते वाहतुकीवर आधीच परिणाम झाला होता. प्रथेप्रमाणे मुंबईकरांना जिथे असतील तिथेच सुखरूप जागी थांबण्याचं आवाहनही करून झालं. काही तासात होत्याचं नव्हतं होण्याची भीती निर्माण झाली होती, पण ऑफिसमध्ये काम लवकरात लवकर उरकण्याच्या नादात ह्याचं लक्षच नव्हतं पावसाकडे.

त्याने सगळं काम उरकलं, लवकर जाण्याची परवानगी घ्यायला म्हणून बॉसकडे जाताना त्याचं लक्ष पॅसेजमधल्या खिडकीतून ढगांकडे गेलं, नव्हे ढगांनीच गडगडाटी हसत त्याला खुणावलं होतं. त्याच्या काळजात अचानक धस्स झालं,पण तरीही मुलीला भेटायला आतुर झालेल्या त्याने बॉसच्या केबिनचा दरवाजा वाजवला.

बॉसने युट्युबच्या लाईव्ह चॅनेलवर बातम्या लावल्या होत्या, "लवकर जाणं सोडाच, पण आज काहीही झालं तरी माझ्यासकट आपल्या स्टाफमधलं कोणीच घरी जाणार नाही, मी रिस्क घेऊ शकत नाही, आय ऍम सॉरी !" इतकं फर्म आणि कॉन्फिडन्ट उत्तर ऐकल्यावर नाईलाजाने त्याला थांबावं लागलं.


  1. "बाबा, तुम्ही आज धावत येण्याची काहीच गरज नाहीय. ऑफिसमध्येच थांबा, आपण उद्या सेलिब्रेट करू" असं मुलीने स्वतः कॉल करून सांगितल्यावर मुलीच्या समंजसपणाचं कौतुक वाटलं त्याला.


सगळ्या कलीग्जनि ती रात्र पत्ते, भेंड्या, दमशराज, अशी मस्त मजेत काढली, पण तरीही आपल्या मनातली भीती, काळजी  कोणीच लपवू शकत नव्हतं. पण ह्याचं लक्ष मात्र सारखं मोबाईलवरच्या मुलीच्या फोटोकडे जात होतं.

एकदाची पहाट झाली, पाऊस एव्हाना ओसरला होता, वाहतूक नुकतीच पूर्ववत होऊ लागली होती, हा धावत धावत निघाला. घरी पोचला कधी आणि कसा हे त्याचं त्यालाच कळलं नाही. पण त्याने डोअरबेल वाजवली, दरवाजा मुलीनेच उघडला. एरवी उशिरापर्यंत झोपून राहते म्हणून आईचा ओरडा खाणाऱ्या ह्या बाबाच्या लाडक्या लेकीला बाबाची चाहूल लागल्याने ती रोजच्यापेक्षा कितीतरी लवकर जागी झाली होती.

तिचा बाबा दोन पाऊलं आतमध्ये आला, आणि त्याने आपल्या लेकीला छातीशी कवटाळलं, कारण तो एक बाप होता

सोमवार, ४ जुलै, २०१६

सहवास

नुकताच श्रावण सुरु झाला होता. नेहमीप्रमाणेच ऊन-सावलीचा लपंडाव सुरु झाला होता. ‘सहवास’मध्येही सर्वत्र हिरवळ पसरली होती. काही रहिवाश्यांनी हौसेने लावलेल्या आणि जोपासलेल्या विविध फुलझाडांना टपोरी फुले आली होती. थोडक्यात ‘सहवास वृद्धाश्रम’चा परिसर नैसर्गिक सौंदर्याने सजला होता.


अशातच ‘सहवास’मध्ये नव्याने आलेली ‘ती’ दोघं बागेतल्या लाकडी बेंचवर बसली होती. दोघंही दोन दिवसांपूर्वीच स्वेच्छेने नोंदणी करून राहायला आली असली तरीही दोघांनीही नावं वेगवेगळी सांगितली होती. त्यामुळे दोघंही एकमेकांना ओळखत असण्याची शक्यता तशी अस्पष्ट होती. म्हणूनच इतर जण नवीन आल्यावर त्यांना एकटं वाटू नये यासाठी जे जे केलं जातं ते ते ह्या दोघांसाठी करताना मला ‘सहवास’चा संचालक म्हणून नेहमीप्रमाणेच एक समाधान मिळत होतं आणि ती प्रोसिजर संपल्यावर आज दोघंही शांतपणे बसले होते.


वसंत लेले म्हणजे तसे वयाने पंच्याहत्तरीच्या एक-दोन वर्षं मागे-पुढे, वयोमानाने डोक्यावर मध्यभागी ‘चांदणे’ पडलेलं आणि आजूबाजूला चांदी पिकलेली, सकाळीच दाढी केलेला गोरागोमटा वर्ण, घारे डोळे, डोळ्यांना सोनेरी कडांचा गोल फ्रेमचा चष्मा असे गृहस्थ जांभळा टी-शर्ट, निळी जीन्स घालून बसले होते. तर अंगभर नेसलेली पांढरीशुभ्र साडी, अंगातला क्रीमिश रंगाचा ऑफ-व्हाईट अर्ध्या हाताचा ब्लाउज, डोक्यावरच्या चांदीने मढलेल्या केसांवर मोगर्याचा गजरा, गोल काळ्या फ्रेमचा चष्मा अशा वर्षा दामले वसंतरावांना सोबत करत होत्या. गेल्या दोन दिवसांमधल्या भेटींमध्ये दोघांच्याही चेहऱ्यावरच्या थोड्याफार सुरकुत्यांतूनही स्पष्ट जाणवणारे पूर्णत्वाचं समाधान दिसत होतेच पण त्याचबरोबर एकप्रकारची हुरुहूर सुद्धा स्पष्ट जाणवत होती आणि म्हणूनच मला नेमकं कळत नव्हतं कि त्यांच्या मनात नेमके काय चालले आहे. एकमेकांना अनोळखी असल्यामुळे त्यांना एकमेकांशी बोलायला तसं थोडं अवघडल्यासारखं वाटत होतं.  .  

          ह्यांच्या वागण्यातलं अवघडलेपण कसं दूर करता येईल ह्याचा विचार मी माझ्या खुर्चीवर बसून, समोरच्या खिडकीतून त्यांना पाठमोरं न्याहाळत करत होतो.


तेवढ्यात वसंतराव बोलू लागले, “तुम्हालाही मोगर्याचा गजरा फार आवडतो वाटतं ?”“तुम्हालाही म्हणजे ? जगातल्या प्रत्येक स्त्रीला मोगर्याचा गजरा आवडत असणार” अशा वर्षाताईंच्या उत्तराने विषय तिथेच संपला म्हणजे हि काही योग्य सुरुवात नव्हे हे वसंतरावांच्या लक्षात आले. पुन्हा थोडा वेळ शांतता पसरली. 

तेवढ्यात रूम नंबर १२ मध्ये राहणाऱ्या ओकांनी हट्टाने मागून घेतलेल्या त्यांच्या पर्सनल व्हीसीआर प्लेयर वर मोठ्या आवाजात शास्त्रीय संगीत लावलं, तसं जयामावशींनी पटकन १२ नंबरकडे धाव घेतली. त्याचं काय असतं कि मॅनेजर वगैरे पोस्ट्सवर काम करून निवृत्त झाल्यावर काहीजणांना सगळ्यांना हाताखाली वागवून घेण्याची सवय लागलेली असते, ओक हे तशाच वृद्ध सभासदांमधले, त्यामुळे सतत कोणालातरी त्यांच्याकडे लक्ष ठेवावं लागे. असो! हा सगळा गोंधळ मिटल्यावर असं लक्षात आलं कि वसंतरावांना वर्षातैंशी बोलण्यासाठी विषय मिळाला होता.

संगीत, नाटक, चित्रपट, चित्रकला वगैरे वगैरे विषय घेत गाडी एकदाची वैयक्तिक आयुष्याकडे गेली.


वसंतरावांचा संसार फार सुखाचा झाला होता. ते स्वतः नॅशनलाइज बँकेमध्ये ब्रांच मॅनेजर म्हणून रिटायर झाले होते, मुलगा सॉफ्टवेयर इंजिनियर होऊन युएसएमध्ये कायमचा सेटल झाला होता. अर्धांगिनी दोन वर्षांपूर्वीच ह्या जगातून इहलोकात गेली होती. आधी दिवसभर बँकेतलं काम, त्यानंतर ब्रेन हॅमरेज झालेल्या पत्नीची शुश्रुषा यांमुळे आता एकट्याला घर खायला उठतं म्हणून ते ‘सहवास’ शोधत सहवासपर्यंत आले होते.


वर्षाताईंचा सुद्धा संसार तसा सुखाचाच झाला होता.  ‘विद्याप्रबोधिनी’ मध्ये हेडमास्तरीण म्हणून कामगिरी सांभाळून त्या रिटायर झाल्या होत्या. नवरा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमधून रिटायर झाला होता. मुलीचं लग्न होऊन ती कॅनडाला शिफ्ट झाली होती. चार वर्षे अर्धांगवायुने झपाटल्यावर   दोन महिन्यांपूर्वीच वर्षाताईंच्या अर्धांगाची सुटका झाली होती. आधी शाळा, क्लासेस यांमध्ये जाणारा संपूर्ण दिवस; त्यानंतर नवर्यासाठी एक केलेलं दिवस-रात्रीचं चक्र, यांमुळे आता घरात एकटं राहवत नव्हतं, म्हणूनच ‘सहवासा’च्या अपेक्षेनं ‘सहवास’ची पायरी चढल्या होत्या.


हे सारं खरंतर त्यांनी फॉर्ममध्ये सुद्धा लिहिलं होतं आणि म्हणूनच माझ्यासाठी किंवा सहवाससाठी हे जाणून घेणं महत्वाचं नव्हतं, पण आमच्यासाठी हे नक्कीच महत्त्वाचं होतं कि निवांत अशा पहिल्याच भेटीत दोघंही आपल्या मनात कुठलाही किंतु न ठेवता व्यक्त होत होती. मुळात सहवासमध्ये स्वेच्छेनं येताना इथं कुणीतरी आपल्याला सांभाळेल, आपली कुणीतरी काळजी घेईल याबरोबरच इथं आपल्याला कोणीतरी असं समवयस्क भेटेल ज्याच्याशी आपलं मन आपण मोकळं करू शकतो असाही एक हेतू असायचा. त्याच हेतूतून आमच्याइथल्या नागरिकांचे, म्हणजे वयोवृद्ध अनाधार लोकांचे ज्यांना आम्ही ‘सहवासचे नागरिक’ असं म्हणायचो, पुरुषगट आणि स्त्रीगट असे दोन गट पडले होते, त्या गटांमध्येही अंतर्गत गट असायचे; ह्या सार्या गटांमध्ये धुसफूस, चिडचिड स्पर्धा आहे हे आमच्या म्हणजे संचालक मंडळाच्या लक्षात आलं होतं आणि कदाचित त्याचाच जालीम उपाय आम्हाला वसंतराव आणि वर्षाताईंच्या रुपात सापडला होता.


हळूहळू दररोज त्या बाकड्यावर वसंतराव आणि वर्षाताई येऊ लागल्या, त्यांच्यातली मैत्री दृढ होत गेली. ते कधी एकत्र गाणी ऐकायचे, कधी गायचे, कधीकधी वसंतराव एखाद्या नाटकातले संवाद म्हणून दाखवायचे. कधी नाटकाला तर कधी फिरायला जायचे. जेवायच्या वेळीही दोघे एकत्रच दिसायचे. कधीतरी एकमेकांना तेचतेच विनोद सांगून हसवायचे, कधीकधी नुसतंच शांत राहायचे, तर कधी एकमेकांचा आधार घेऊन रडायचे सुद्धा. असेच दिवस जात होते. मुळात आता एकमेकांच्या अनेक गोष्टी त्यांना शब्दांशिवाय कळू लागल्या. आम्हाला वाटायचं कि हे पुन्हा एकदा प्रेमात पडलेत, पण दोघांच्याही आधीच्या जोडीदारासोबतच्या आठवणी इतक्या घट्ट होत्या कि त्यांनी स्वतः प्रयत्न केला असता तरीही ते त्या पुसू शकले नसते. पण तरीही त्यांच्यात मैत्रीपलीकडचे एक अनामिक नाते निर्माण होत होते.


ह्या सार्याचा केवळ ‘सहवास’चा संचालक म्हणूनच नव्हे तर प्रत्यक्षदर्शी म्हणूनही साक्षीदार होतो. कारण माझ्या केबिनला असलेली खिडकी आणि त्या दोघांचा ठरलेला बेंच ह्यात फक्त एका ८ फुटाच्या कॉरिडोरचं अंतर होतं. आणि पूर्वी मुद्दामच मी त्या खिडकीच्या समोरच माझं टेबल सेट केलं होतं जेणेकरून बाहेर लक्षहि ठेवता यायचं त्याचाच फायदा आज होत होता. एक अनामिक नातं रुजत असताना त्याची प्रक्रिया मी जवळून पाहिली होती.      

एक दिवस वसंतराव आणि वर्षाताई दोघंही माझ्या केबिनमध्ये आले.

“ या, या बसा... काय वसंतराव ? केबिनमध्ये कशाला आलात, चंदूबरोबर निरोप पाठवायचा, लगेच आलो असतो कि तुमच्या रूममध्ये. ”

“ थोडं वैयक्तिक बोलायचं होतं आणि ते माझे रूम पार्टनर देशपांडे, त्यांच्या तोंडात तिळहि भिजत नाही. तुम्हाला कळणं महत्वाचं होतंच पण त्याचबरोबर त्यांनासुद्धा कळायला नको असं काहीसं असल्यामुळेच आम्ही दोघंही स्वतः आलो.”

“म्हणजे नेमकं काय ..?” आधीच थोडासा अंदाज असला तरीही वसंतरावांनी इतकं प्रायव्हेट काहीतरी सांगायचंय असं भासवल्याने मीही बुचकळ्यात पडलो. मुळात ह्यांच्या अशा नेहमीच सोबत असण्याने ‘सहवास’मध्ये कुजबुज सुरु झाली होतीच. पण आम्ही ती जाणीवपूर्वक दोघांपासून दूर ठेवण्यात यशस्वी झालो होतो.


“आम्ही दोघंही ‘सहवास’ मध्ये आलो तेच मुळात कुणाचाच सहवास नसल्याने, सहवासाच्या ओढीने !
आलो ते नेमकं योगायोगाने एकाच वेळी, दोघंही एकदम आलो म्हणून थोडीशी उत्सुकता होतीच एकमेकांविषयी. हळूहळू एकमेकांची ओळख वाढत गेली, मैत्री होत गेली, एकमेकांचा स्वभाव एकमेकांना कळत गेला आणि लक्षात आलं कि माझ्या ‘वर्षा’मध्ये आणि ह्या वर्षामध्ये फक्त नामसाधर्म्यच नव्हे तर दोघांचे स्वभावहि फार मिळते-जुळते आहेत. दोघींनीही एकदा एखाद्याला आपलंसं केलं कि त्याने तोडेपर्यंत दोघींचही आयुष्य त्याच्याभोवतीच गुरफटून राहणार ...”

“ अगदी वसंताच्या बाबतीतहि हेच म्हणता येईल. माझे ‘शरद’ सुद्धा असेच परखड, निःपक्षपाती, निर्भीड, स्वाभिमानी होते.” आत्तापर्यंत शांत असलेल्या वर्षाताई बोलल्या.

“ तेव्हा आम्ही तुम्हाला विनंती करतो, प्लीज आम्हा दोघांनाही एका रूममध्ये राहायला मिळावं. मुळात माझ्या स्पष्टवक्तेपणाने इतर पुरुष  सभासद माझ्या सोबत राहायला तयार नाहीत. आणि त्याचजोडीला मला संसाराचा गाडा ओढताना ‘माझ्या वर्षा’सोबत करायच्या राहिलेल्या गोष्टी पूर्ण करता येतील. ” वसंतराव घडाघडा नेहमीप्रमाणेच मनातलं सारं स्पष्टपणे बोलून गेले आणि नंतर वर्षाताईंकडे पाहू लागले.

“ मुळात मला संस्थेच्या नियमांप्रमाणे असं करता येणार नाही, पण त्याचबरोबर एक पर्यायसुद्धा सांगतो, तुमच्या दोघांच्या फॅमीलीजना काहीही हरकत नसेल तर तुम्ही दोघांपैकी एकाच्या मूळ घरी एकमेकांसोबत राहू शकता” खरंतर मलाच ‘नाही’ म्हणताना वाईट वाटत होतं पण पर्याय ऐकल्यावर दोघांच्याहि चेहऱ्यावर हसू  फुललं. कारण वसंतरावांच्या मुलाला भारतात यायचंच नव्हतं त्यामुळे त्यांच्याघरी दोघंही राहू शकत होते.

त्या संध्याकाळी वसंतराव वर्षाताईंसाठी मोगर्याचा गजरा घेऊन आले होते, वर्षाताईंनी वसंतरावांकडून तो हौसेनं माळून घेतला आणि त्यानंतरमात्र दोघेही अश्रूंमध्ये चिंब भिजले.

दुसर्या दिवशी सकाळीच दोघेही ‘निरोप’ घ्यायला केबिनमध्ये आले. दोघांच्याही चेहऱ्यावर पूर्वीप्रमाणे पुर्णत्वाचं समाधान होतंच, पण आता ‘ती’ पूर्वीची हुरहूर जाऊन एक गोड हास्य उमललं होतं. त्या दोघांनी जणू ‘सेकंड इनिंग’ला सुरुवात केली होती.    
     .                                                                                                                                       

भारद्वाज आणि संजय : एक प्रेमकथा

"का रे भारद्वाजा ?;

एरवी गवतात लपून छपून मला निरखत असतोसतुझी मान तर सारखी टुकू-टुकू हलत असतेस मग आज सकाळीच त्या झाडावर असा शांत का बसलायस ??


लहानपणापासून तुझी कुकडूक ऐकत आलेलहानपणी तुझ्या आवाजाला मी प्रत्युत्तर द्यायचेमग शिवाशिवीचा खेळ चालायचा आपला !


मग हळूहळू मोठी होत गेलेकॉलेजला गेले तसतसा तो वेडेपणा वाटायला लागला कारण नवीन क्षितिजे खुणावू लागली होती.


मग शेवटच्या वर्षाची परीक्षा झाली आणि मी घरी आलेघरी आल्या आल्या संजूराजूमिनूनिनु माझ्याभोवती नाचू लागले आणि नाचता नाचता गाऊ लागले, "ताईचं लग्नताईचं लग्न" 


अप्पा खुश होऊन सांगत होते, "बाळा नाव काढलंस" खरंतर लहान असल्यापासून 'नकुशीझालेले मीआज काय असं घडलं ?, तर पुण्यातल्या रावसाहेब देशपांड्यांनी स्वतः घरी येऊन त्यांचा एकुलता एक मुलगासंजयसाठी मला मागणी घातली होती. 


रावसाहेब म्हणजे मोठं प्रस्थ! लक्ष्मी आणि सरस्वती ज्यांच्या घरी पाणी भरते असं लहान असल्यापासून ऐकलं होतंत्या रावसाहेबांनी आपल्या 'नकुशी'ला मागणी घालणं हा अप्पांसाठी आश्चर्याचा सुखद धक्का होता.
पुण्यात मोठ्ठा वाडाभोसरीमध्ये लांब-रुंद शेतजमीननोकर-चाकरअसं घरचं सारं तर ठीक होतच पण उंचअंगापिंडाने मजबूतदेखणागोरा-गोमटापिळदार मिश्या असलेले संजयलग्नाला माझा विरोध असण्याची काहीच गरज नव्हती. अर्थात मी संजयना लग्नापूर्वी फक्त फोटोत पाहिलं होतं.


 
नाही म्हणायला मागणी येण्यापूर्वीमी पुण्यात आत्याकडे राहत असताना आत्येभावाच्या मित्रांबरोबर संजयहि आले होते आणि ते गप्पांमध्ये कमी मला पाहण्यातच जास्त रंगले होतेआणि ते आत्येभावाच्या इतकं लक्षात आलं कि तो त्यानंतर मला 'श्रीमती संजय'च म्हणू लागला.


होता-होता लग्न झालंएक महिना सुखात आणि सुखस्वप्नं रंगवण्यात गेला आणि सैन्यात कॅप्टन असलेल्या संजयना सीमेवर रुजू होण्याचा आदेश आला.


संजय गेले आणि पुन्हा एकदा पदरी उपेक्षा-अवहेलना-टोमणे-दुःख यांची ढग आली. कारण तेव्हा गेलेले संजय आजही परतले नाहीत. सुरुवातीला आमचं प्रेम पत्रातून वाढत होतंपण काही दिवसांनी सारंच संपलं.


त्यांचाच बटालियन मध्ये असणाऱ्या आतेभावाच्या सांगण्यानुसार ते कदाचित पाक सैन्याकडे कैदेत असतील. तर केंद्र शासनाने त्या युद्धातल्या मृतांच्या यादी त्यांचे नाव घातले.


कुणी कै तर कुणी कै सांगत राहिलेघरी सगळेच संजयच्या शोकात बुडाले. 


पण मी आज पर्यंत कधीच संजयसाठी रडले नाहीआजहि सधवेसारखीच राहतेकारण मला माहितीय आजही माझे संजय जिवंत आहेत आणि ते कधीनकधी परतुन नक्की येतील.


पण सासरच्या साऱ्यांनी मात्र तेव्हाच संजय 'मृतझाले हे गृहीत धरलंमी त्यांच्या घरात 'काळ्या पायांनीआले होते नाशेजार-पाजाऱ्यांनीनातलगांनी 'वांझठरवले होते.


संजय ज्यांच्यासाठी सीमेवर गेला होतातो ज्यांच्यासाठी हरवला आहेत्यांपैकी काही जणांनीच संजयच्या 'प्रिय  संज्योतिसवांझकाळ्या पायाची ठरवली होतीहे जर त्यांना समजलं असतं तर संजयनी लगेच माझ्याकडे धाव घेतली असती. पण त्यांना कळवण्याचा काहीच मार्ग नव्हता.


म्हणून आजपर्यंत त्यांची वाट पाहते आहे.


खात्री आहे एक दिवस संजय नक्कीच परततील.


आणि आज तू असा शांत बसून कसले संकेत देत आहेस ?


येतील का रे संजय परत ?


अरेत्या टॅक्सीतुन ते कोण उतरते आहे उंचबळकट देहयष्टीगोरा वर्णपिळदार मिश्यासैनिकी पोशाख ! अरे 'हेनक्कीच संजय आहेत कि मला पुन्हा एकदा भास होतोय ? 


अरे हे कायसंजयच आहेत हे नक्कीअच्छा तर लब्बाडा ह्यासाठी शांत बसला होतास होयआता तुही ओरड आणि तुझ्यासोबत मी ओरडणार 'कुक्कुड कुक'"©

काल्पनिक प्रवासवर्णन



मी ना धड आस्तिक-ना धड नास्तिक होतो तेव्हा नर्मदामैय्याने माझ्या आयुष्यात घडवलेल्या परिवर्तनाची हि कथा !!

हि गोष्ट आहे ती मी बारावी झाल्यानंतरची, वयाचं १६वं वर्षं ओलांडून १७व्या वर्षात पाऊल ठेवलं होतं. त्यामुळे अंगात तारुण्याचं सळसळतं वारं भरलं होतं. जगाच्या विरोधात जाऊन जग जिंकण्याची खुमखुमी चढली होती. मुळातच बाबांचं लग्न उशिरा झालं होतं आणि त्यातही लग्नानंतर गर्भार होण्यासाठी आईला अधिक कालावधी लागला होता, त्यामुळे बाबांमध्ये आणि माझ्यामध्ये जनरेशन गॅपची भिंत उभी राहिलेली. आणि त्यात लागलेली संगत, परिणामी व्यसनांच्या आहारी गेलो होतो, त्यामुळे घरी रोजच भांडणं व्हायची. त्यात बारावीत आकर्षणाला प्रेम समजून वाहवत गेलो. या सार्याचा परिणाम बारावीच्या निकालात दिसलेला.  आता करायचं काय ? घरी कसं जायचं ? बाप मारेल काय ? घरातून बाहेर काढेल काय ? नुसतं थैमान घातलं होतं विचारांनी. अनेकदा डोक्यात आत्महत्येचे विचारही येऊन गेले होते. रात्री ७ वाजेपर्यंत मी कॉलेजमध्येच बसून होतो.  

त्यात एका मित्राने सुचवलं, “अरे एवढं कसलं टेन्शन घेतोस ? सरळ २-४ दिवस घरातून गायब हो, घरचे इमोशनली फुल बनतील आणि काहीही बोलणार नाहीत.”


घरी जायचं कुठे वगैरे विचार करायला वेळच नव्हता. तसाच गेलो दादर स्टेशनला; अहमदाबादच्या मित्राकडे जायचं असं ठरवून चढलो तो नेमका पंजाब मेल मध्ये a/c बोगीत. 


खरंतर तिकीट वगैरे काहीच नव्हतं.

तेवढ्यात एक धिप्पाड, जाडजूड, काळ्या वर्णाचा आजोबांच्या वयाचा माणूस माझाकडे आला आणि मला म्हणाला, “बेटा कहाँ जा रहे हो ?”


“अ...अं..” त्याला बघुनच एवढा घाबरलो होतो की अहमदाबाद हे नावच तोंडून निघेना.


“अच्छा, तो तुमभी ओंकारेश्वर जा रहे हो, तो चलो फिर साथ चलते हैं; तेरा सिट नंबर क्या है बेटा ?”

मी विचार केला की नाहीतरी फक्त घरापासून २-४ दिवस दूर राहण्यासाठी जायचय मग अहमदाबाद असो किंवा ओंकारेश्वर मला काय फरक पडतो ?  


“अंकल मेरेपास तो टिकट ही नही है” इति मी ! 


“चलो कोई दिक्कत नहीं. यह तो अच्छा ही है, क्यूंकि मेरे पास एक जादा है”


टीसी आला, त्या बाबाने तिकिट दाखवल, टीसी निघून गेला.


रात्रि म्हातारबाबाने आणलेला कुसली नावाचा करंजीसारखा दिसणारा फार चविष्ट आणि गोड पदार्थ खाल्ला, जणू काही हा मला गोड आवडतं म्हणूनच घेऊन आला होता.   ते खाऊन झोपलो ते म्हातारबाबाने पहाटे ४.३० ला उठवलं, “बेटा, जाग जाओ, अभी खांडवा मे उतरना पडेगा. तभी तो ओंकारेश्वर जा पाओगे”


या त्याच्या शेवटच्या शब्दांत इतका विश्वास होता कि मलाच एक सेकंद वाटलं कि मी खरच ओंकारेश्वरला जाण्यासाठी आलो होतो. 


खांडवा स्टेशनला उतरलो आणि म्हातारबाबाने सांगितलं “बेटा हमे अभी बससे ओंकारेश्वर जाना है”
मग जवळ-जवळ १.३० तासात आम्ही ओंकारेश्वरला पोहोचलो होतो, बसमधून उतरताना माझ्यासोबतच उतरलेला म्हातारबाबा “मै जल्दहि आता हूँ” असं म्हणत कुठे गायब झाला ते कळलच नाही.


पण आता सोबतीला हजारो लोक होते, आणि तेही माझ्यासारखेच रस्ता चुकून आले असावेत असं वाटत होतं.मग मीहि एक अनुभव म्हणून त्यांच्याबरोबर ओंकारेश्वराच्या मंदिरात गेलो आणि काय आश्चर्य, शिवलिंगाच्या जागेवर कालचा म्हातारबाबाच ध्यान लावून बसला होता. आणि मग मी नर्मदामैय्याच्या भेटीसाठी गेलो. 

तिथे गेल्यावर मनातली सगळी खळबळ क्षणार्धात कुठल्याकुठे पळून गेली, मी इथे का आणि कसा आलोय हेही विसरून गेलो. 


 खरंतर घरी परतण्याची इच्छा नव्हतीच पण ४ दिवसांनी ‘तो’ म्हातारबाबा स्वप्नात आला, “बेटा, अब घर जाओ, माँजी-बाबूजी फ़िक्र कर रहे है पर हमे भुलना नही

मग परतलो तर काय आश्चर्य ! माझ्या घरी बोर्डाकडून फोन आला होता कि माझी marksheet चुकली होती.               

जणू काही नर्मदामैय्याच मला बोलावीत होती आणि मला घेऊन येण्यासाठीच त्या बाबाला तिने मुंबईला पाठवलं होतं, असं वाटू लागलं. 

मग कधी भरकटलो नाही, भरकटलो तरीही म्हातारबाबा स्वप्नात येतो आणि सांगतो “बेटा माँ बुला रही है” अणि मग मी परत तितक्याच ओढीने नर्मदा मैय्याकडे धाव घेतो.                                                                                        

भातुकली

"मैथिली, प्लिज ऐकून घे.मला माहितीय, माझी सुनीलशी वाढती मैत्री नाही आवडत तुला. पण मी तरी काय करू ? सिक्युअर वाटतं गं त्याच्याबरोबर.तुझा बाबा कसा होता हे तुला समजलं तर तू मला नक्कीच समजून घेशील."

मनीषा, वेगळं झाल्यावर पहिल्यांदाच आपल्या मुलीला मनातलं सांगत होती.

_________________________________________

" महेश, तुझा बाबा !" इतकं बोलून झाल्यावर मनीषाने उसासा टाकला आणि ती पुढे बोलू लागली.

" शिक्षण पूर्ण होईपर्यंत बाबा माझं लग्न महेशशी ठरवून मोकळे झाले होते.

गंमत म्हणजे मी महेशला अंतरपाट दूर होण्याआधी पाहिलं नव्हतं.

मी गोरीपान, सुंदर, कॉलेजक्वीन तर तो जाडा, ढेरपोट्या, काळा. थोडक्यात कुठल्याच बाबतीत आम्ही अनुरूप नव्हतो. त्याला हुंडा द्यायचा नव्हता एवढाच दिलासा होता. 

पण त्याच्या संसाराच्या कल्पना जगावेगळ्या होत्या. रात्री अंथरुणापुरतं नवरा झालं कि नवऱ्याचं कर्तव्य संपायचं त्याचं.


दिवसभर अपमान, टोमणे, खोचक बोलणं याबरोबरच कधीतरी तर रट्टेसुद्धा आणि दररात्री समाजमान्य बलात्कार करायचा तो माझ्यावर. 

त्याच समाजमान्य बलात्कारातून तू जन्माला आलीस, तेव्हा खरंतर त्याला मुलगा हवा होता.त्याने तुला मारायचा केलेला प्रयत्न मी हाणून पाडला

आणि माझा त्रास दुप्पट वाढला.

त्याला एक वाक्य म्हणायची सवयच लागली होती, "संसार म्हणजे काय भातुकलीचा खेळ वाटतो का ?"
बाबांना हे कळलं तर हार्ट अटॅक येण्याची शक्यता असल्यामुळेच सारं सहन करत राहिले. पण ते झालंच, बाबा हे सहन करू शकले नाहीत. 

बाबा गेल्यावर मात्र मला असह्य होऊन मी ते माझ्यावर लादलं गेलेलं नातं संपवलं कारण महेशने काही पर्यायच ठेवला नव्हता. ___________________________________________

मग जॉबला लागले, करस्पॉन्डन्सने मास्टर्स केलं, जोडीला तुझी जवाबदारी.  म्हणून आई आपल्याकडे राहायला आली.मग माझं प्रमोशन होऊन टर्मिनेशन हाती आलं, मग पुण्याहून मुंबईला आलो.

मुंबईच्या ऑफिसमधल्या पहिल्या दिवशीच मला सुनील भेटला. 

मला सर्वथा अनुरूप असा हा मुलगा पण आता काय उपयोग होता ?

पण त्यापेक्षाहि सगळ्यात जास्त तो मला समजुन घ्यायचा. मला काही हवं-नको बघायचा.मला दरमहिना कसलीतरी गरज लागायची आणि मी त्याच्याकडे अगदी निःसंकोच मागायचे.मुख्य म्हणजे त्याची हि सारी मदत निरपेक्ष होती.


ह्यातूनच हळूहळू आमची मैत्री वाढलीय, वाढतेय.


पण आज आम्ही कदाचित एका वेगळ्या टप्प्यावर पोचलोय. 

मैत्री म्हणत म्हणत एकमेकांच्या प्रेमात कधी पडलो ते आम्हालाही कळलं नाही.पण आज त्याने जाणीव करून दिलीय.

तो म्हणालाय, "तुझी आणि मैथिलीची, दोघांचीही तयारी असेल तर मग मला तुमच्या शी खराखुरा भातुकलीचा खेळ खेळायचाय. ज्या खेळात फक्त सुख-समाधानानं आपण हसत राहू आणि जो डाव कधीच अर्ध्यावर मोडणार नाही.तुला काय वाटतं, काय उत्तर द्यावं ??"

खरंतर आपल्याला आजवर एखाद्या 'सुपरहिरो' सारखा भासणारा आपला बाबा असा असेल हा मैथिली साठी जबर धक्काच होता. पण त्या मिनिटभरानंतर  धक्क्यातून सावरताना मैथिलीने एक निर्णय घेतला आणि ती आपल्या आईच्या दुसर्या लग्नाच्या तयारीला लागली.      

मी असा घडलो

मुळात आमचे आई-बाबा पहिल्यापासूनच हौशी. त्यामुळे असे बरेच किस्से आहेत. त्यातले काही किस्से : 

  • किस्सा प्रकार :- गावातल्या नाटकाचे किस्से
मु.पो.चवे-देऊड हे ता.जि.रत्नागिरीतले, गणपतीपुळ्यापासून १४किमीवर असणारे आमचे मूळ गाव. साधारण ३०० वर्षांपूर्वी आमच्या पूर्वजांपैकी एकाला गावच्या नदीत अंघोळ करताना स्वयंभू गणेशमूर्ती सापडली, त्या मूर्तीसाठी देऊळ बांधले. दर माघी गणेशजयंतीला उत्सव होतो. उत्सवप्रेमी कोकणी माणसाचे दुसरे वेड म्हणजे उत्सवातील नाटक ! आमच्याकडेही २००५पर्यंत आम्ही(आई-वडील आणि त्या पिढीतील देऊडकर) स्वतः नाटक बसवायचे त्या नाटकातले हे दोन प्रसंग..पहिला प्रसंग जेव्हा घडला तेव्हा अस्मादिक ४वर्षांचे होते. त्यावेळी अत्र्यांचे ‘कवडीचुंबक’ नावाचे नाटक ठरले होते. नाटकातल्या नायकाला एक वैशिष्ट्यपूर्ण पगडी पोशाखात दिली गेली होती. ती अस्मादिकांनी रंगीत तालमीच्या वेळी पाहिली कारण आई-बाबा दोघेही नाटकात असल्याने आम्हाला तालीम बघण्याचा अलिखित अधिकार होता. नाटकाची वेळ जवळ आली होती. भूमिका असलेल्या माणसांच्या तोंडाची रंगरंगोटी चालू होती. अस्मादिकांना प्रेक्षकांमध्ये बसलेल्या मामाकडे सोपविले होते. आणि मला काय वाटले काय ठावूक ? पण ‘पंपुशेठ’ नावाच्या नायकाची ‘ती’ पगडी घालून उघड्या रंगमंचावर फिरण्याचा हट्ट मी धरला. मी कोणाचही ऐकेना म्हणून शेवटी अर्ध्या मेकअपवर बाबा विंगेतून पटकन माझ्याकडे आले आणि मला घेऊन परत विंगेत गेले, तेही मला शांत करण्याच्या प्रयत्नात. पण मी त्यांचंही ऐकेना म्हणून शेवटी पंपुशेठचं काम करणाऱ्या माणसाबरोबर नांदीपूर्वी पडदा उघडून मला ‘ती’ पगडी घालून एक फेरी मारायला दिली गेलीदुसरा किस्सा मी चौथीत असतानाचा. बाबाच दिग्दर्शक. मला त्यावर्षीच्या नाटकात काम करायचे होते, पण ‘पद्मश्री धुंडिराज’ ह्या पुरुषपात्र-विरहीत   नाटकात माझ्यासाठी एकही भूमिका नव्हती. मग शेवटी रागावून सगळ्यांशी अबोला धरला तेव्हा मूळ संहितेत नसलेली भूमिका निर्माण करून बाबांनी मला नाटकात घेतले. पण नाटकाच्या वेळी प्रेक्षकांमध्ये आपलीच माणसं बसलेली बघून कुरुक्षेत्रावर युद्धापूर्वी अर्जुन जसा गलितगात्र झाला होता हे अनुभवले. मी खरंतर पळून समोर प्रेक्षकांमध्ये उडी घेणार होतो, पण नाटकातल्या आईने म्हणजे मोठ्या काकूने हात घट्ट धरून ठेवला आणि माझी सगळी वाक्य कापून फक्त माझी उपस्थिती ठेवून नाटक यशस्वीपणे पार पाडले गेले.
  •  किस्सा प्रकार दुसरा : शाळेतल्या स्नेहासंमेलातले किस्से

ह्यात अगदी नाटक लिहिण्यापासून सारी मदत आई-बाबांनी केलेली आहे. कधी जुन्या एक्सरेपासून मुकुट कर, तर कधी त्यावर कापूस लावून दाढी-मिश्या तयार कर; कधी इलेक्ट्रिक केसिंगपट्टी पासून तलवार कर, तर कधी मोरपिसे आणून मला मोर कर असे अनेक प्रकार, अनेक वेशभूषा कधी घरातील टाकाऊ पासून तयार करून तर कधी लोकांकडून मागून आणून मला स्नेहसंमेलनासाठी तयार करणे हि मुख्य जवाबदारी आई-बाबानी शाळेची १०वर्षे पार पाडली. सहावीत असताना सरांनी मला “नाटक लिहिणार का ?” विचारलं, खरंतर ह्याआधी असं काहीच केलं नसताना मी ‘हो’ म्हटलं. खरंतर धड्याचेच नाट्यरूपांतरण करायचे होते; पण मला जमेना. तेव्हा आईने स्वतः लिहून दिले आणि शाबासकी मला मिळाली.ज्यावेळी इतर सार्याच सहभागी विद्यार्थ्यांचे पालक प्रेक्षकांमध्ये बसलेले असायचे तेव्हा अनेकदा माझे आई/बाबा वरती माझी आणि इतर मुलांची तयारी करून देत असायचे. हीच गोष्ट शाळेतल्या फँन्सी ड्रेस, वारी अशा अनेक वेळी झाली. आई-बाबा होते म्हणून अनेक ठिकाणी बक्षिसे मिळवली, आई-बाबा होते म्हणून अनेक ठिकाणचे अपयश पचवू शकलो.
  • किस्सा प्रकार तिसरा : ‘मनाचे श्लोक’ पाठांतर स्पर्धा

तिसरीत इतरांपेक्षा कमी पाठ झाले म्हणून वगळण्यात आल्यानंतर आईने ४थीला माझ्यावर जीवापाड मेहनत घेतली आणि इतरांपेक्षा अचूक म्हणू लागलो. पण इतरांपेक्षा अचूक म्हणतो आणि टीमचे कोऑडिनेशन होत नाही म्हणून वगळण्यात आले. तेव्हा त्यासाठी आईने शाळेत जाऊन राडा घातला होता, त्यावेळची ‘ती’ रणचंडिका माता काही झाले तरीही विसरू शकत नाही.
  • किस्सा प्रकार चौथा : कॉलेजमधला पहिल्या आयएनटी चा किस्सा (पुणेकरांसाठी : आय.एन.टी. हि पुरुषोत्तम प्रमाणेच एक दिग्गज एकांकिका स्पर्धा असते)

माझी आय.एन.टी. ची पहिलीच वेळ. जत्रेचा सीन होता. फुगेवाल्याची भूमिका मला दिली गेली होती. मध्ये ‘स्टॅच्यु पोजिशन’ आणि ‘स्लो मोशन’ होते. मी ‘स्टॅच्यु पोजिशन’मध्ये न थांबता स्लो मोशन मध्ये लाईटलाईनच्या म्हणजे जिथे रंगमंचावरचा लाईट पडत नाही त्या भागात जाऊन पुन्हा तसच फिरून झिरो विंगेतून आत न जाता सेकंड लेफ्ट विंगेतून आत गेलो.
  • असे अनेक किस्से, अनेकांचे हातभार, अनेकांचे सांभाळून घेणे, अनेकांनी ‘शाळा’ घेणे ह्यामुळे रंगमंचावर सरावलो आहे, आणि कधीच न जाणारे नाट्यवेड घेऊन प्रवास करत आहे.